Saturday, 21 November 2015

गडचिरोली जिल्हा घडीपुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमोचन

चंद्रपूर : राज्याच्या वर्षपूर्तीनिमित्त गडचिरोली जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने काढण्यात आलेल्या 8 पानी विशेष घडीपत्रिकेचे विमोचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी झाले.

ताडोबा येथील मोहर्ली या गावात मुख्यमंत्री वनविभागाच्या एका कार्यशाळेच्या समारोपास आले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत हे विमोचन झाले. गडचिरोलीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी घडीपत्रिकेबाबत मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांना माहिती दिली.

यावेळी व्यासपीठावर आमदार नानाभाऊ शामकुळे, संजय धोटे, किर्तीकुमार भांगडिया, महापौर राखी कंचर्लावार तसेच प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.के.निगम व श्री.भगवान आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

गडचिरोली जिल्ह्यात नव्या शासनाच्या वर्षभरात झालेल्या कामांचा आढावा या घडीपत्रिकेच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. आठ पृष्ठांची सचित्र घडीपत्रिका जिल्ह्यात विविध क्षेत्रात झालेल्या विकास कामांचा परिचय देते.

अतिदुर्गम आणि राज्याच्या सिमावर्ती भागाच्या या जिल्ह्यात नक्षल चळवळीचा उपद्रव आहे. याचा मुकाबला शासनाने उत्तमरित्या केला आहे. या ठिकाणी पोलीस दलातर्फे राबविण्यात आलेल्या नक्षलवाद्यांसाठीच्या आत्मसमर्पण योजनेत या वर्षभराच्या कालावधीत 35 जणांनी प्रतिसाद देऊन नक्षलवादाचा मार्ग सोडला.

आत्मसमर्पण करणाऱ्‍या नक्षलवाद्यांचे पुनवर्सन आणि नक्षलवादी व त्यांच्या कुटुंबियांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य तसेच कौशल्य प्रशिक्षण याबाबतची माहिती यात आहे.

या जिल्ह्यात असणाऱ्‍या आदिवासी कुटुंबातील शिक्षण घेणाऱ्‍या मुला-मुलींना जगाचा परिचय व्हावा या उद्देशाने पोलीस दल महाराष्ट्र दर्शन सहल आयोजित करते. या विद्यार्थी सहलीतील मुलांशी मुख्यमंत्र्यांची भेट आणि त्याबाबतची इतर माहिती या घडीपत्रिकेत आहे.

जिल्ह्यात जलयुक्त शिवारअंतर्गत मोठ्या प्रमाणावर सिंचन संदर्भातील कामे झाली. या माध्यमातून संरक्षित जलसिंचन क्षमता या जिल्ह्यात निर्माण झाली आणि त्यामुळेच एका पिकावर समाधान मानणाऱ्‍या या जिल्ह्यात आता दुसऱ्‍या हंगामात पिके घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या जलयुक्त शिवारअंतर्गत झालेल्या कामांचा सचित्र आढावा यामध्ये घेण्यात आला आहे.

अतिदुर्गम अशा या जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र वनांनी व्यापलेले आहे आणि सर्वाधिक लोकसंख्या आदिवासींची आहे. या वनांचे सरंक्षण करताना याच्या माध्यमातून येथील स्थानिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी वनविभाग कार्य करीत आहे. याचाच एक भाग म्हणून बांबूवर आधारित उद्योग, अगरबत्ती प्रकल्प आदी जिल्ह्यात आहेत. ही या जिल्ह्याच्या दृष्टीने एक यशकथाच म्हणावी लागेल. याचीही सचित्र माहिती यात सामील आहे.

No comments:

Post a Comment