Tourism

ऐतिहासिक व धार्मिक जिल्हा

गडचिरोली जिल्हा घनदाट जंगल, दऱ्याखोऱ्या आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. येथे अनेक निसर्गरम्य स्थळे, विलोभनिय नद्याचे संगम व ऐतिहासिक व धार्मिक स्थळे आहेत परंतु दळणवळणाच्या सोयी अभावी घनदाट जंगल व इतर सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे या जिल्हयाला पर्यटनास वाव मिळालेला नाही. मात्र या परिस्थितीत आता लवकरच बदल होणार आहे. जिल्हयात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत त्यापैकी काही स्थळांची थोडक्यात माहिती खालील प्रमाणे आहे. 
मार्कंडेश्वर देवस्थान
गडचिरोली जिल्हयात तसेच विदर्भात भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून मार्कंडा तिर्थस्थान ओळखला जातो. जिल्हा मुख्यालय यापासून 45 कि.मी. अंतरावर चामोर्शी तालुक्यात मार्कंडा हे देवस्थान असून ते चामोर्शीच्या वायव्यच्या दिशेला आहे.

वैनगंगा नदीच्या उत्तर वाहिनीच्या डाव्या तिरावर वैभवशाली इतिहासाची साक्ष देत व उत्कृष्ठ शिल्पकलेची आठवण करुन देणारे मार्कंडा देवालय आहे. प्रगट कला संस्कृतीचे, मार्कंडेय

ऋषीच्या नावाने ओळखले जाणारे मार्कंडेश्वर मंदिर सर्वात मोठे असून मुर्तीमंत मंदिर आज दिमाखाने उभे आहे. मंदिराच्या सभोवताल दगडावर वेरुळ, अजिंठा व खजुराहो प्रमाणे कलाकृतीचे नमुने भिंतीवर कोरलेले आढळतात. मंदिराच्या गाभाऱ्यात महादेवाची पिंड आहे. पिंडीच्या खाली भुयारीवाट असल्याचे जुने लोक सांगतात. या ठिकाणी वैनगंगा नदी उत्तरवाहिनी वाहत असल्यामुळे या ठिकाणाला पुराण काळापासून भाविकांसाठी विशेष आकर्षण निर्माण झालेले आहे. हे हेमाडपंथी मंदिर आहे.

मंदिराच्या भोवती अनेक लहान मोठया देवळांचा समूह असून काही मंदिराचे भग्न अवशेष पाहायला मिळातात. मंदिराजवळ ज्योतिर्लिंग असून मंदिराला लागून भुवनेश्वर, गणपती, हनुमान, महिषासूर मर्दिनी यासारखे लहान-मोठे मंदिर आहेत. मुख्य मंदिरापासून वैनगंगा नदीच्या पात्रात उतरण्याकरीता पायऱ्या आहेत. " विदर्भाचे खजुराहो " म्हणून ओळखले जाणारे लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आणि पर्यटकांना आकर्षित करणारे हे ऐतिहासिक तिर्थक्षेत्र आहे.

सर्वप्रथम ब्रिटीश इतिहासकार सर कॅनिंगहॅम यांनी मार्कंडा मंदिर समुहाला भेट दिल्याचा सेंट्रल प्रॉव्हिन्सेसच्या रिपोर्ट 1873-74 आणि 1874-75 वरुन दिसून येतो. या भेटीत त्या ठिकाणी 24 देऊळ असल्याचे नमूद केले असून या मंदिराचे बांधकाम इसवी सनाच्या दहाव्या शतकात झाल्याचे म्हटले आहे. 24 देऊळापैकी आता चारच देऊळ सुस्थितीत असून त्यातील 20 देऊळे पडक्या अवस्थेत आहेत त्यातील काही लुप्त झाले आहे.
1973 च्या चंद्रपूर गॅझिटिअरमध्ये मार्कंडा मंदिर समुहाने बांधकाम राष्ट्रकुटांनी केल्याचे नमुद आहे. प्रसिध्द इतिहास संशोधक स्व. डॉ. गिराशी यांच्या मते आठवया शतकाच्या अखेरीस होऊन गेलेला राष्ट्रकुट सम्राट तिसरा गोविंदा यांच्या काळात मंदिराचे बांधकाम झाले असावे. विदर्भात अनेक ठिकाणी त्याचे ताम्रपट सापडले असून त्यातील उल्लेखावरुन त्याची राजधानी

'मयुरखंडी' येथे होती. मार्कंडा किंवा मार्कंडी हे काळाच्या ओघात झालेले मयुरखंडीचे अपभ्रम्य रुप असावे अशा या अप्रतिम कलाकृतीने नटलेल्या वास्तुशिल्पाची दुरावस्था झाली आहे. पुरातत्व विभागाने लक्ष न दिल्यास व जनप्रतिनिधीच्या दुर्लक्षितेमुळे मार्कंडेश्वराचे मंदिर नामशेष होऊ शकतो.

दरवर्षी महाशिवरात्रीला या ठिकाणी 15 दिवस ते पाऊण महिन्यांपर्यंत भव्य यात्रा भरते. गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर व विदर्भातील लाखो भाविक मार्कंडेश्वराच्या दर्शनासाठी येतात. जिल्हा मुख्यालयाहून भाविकांना जाण्यासाठी गडचिरोली-चामोर्शी मार्गे मार्कंडा एस.टी. बसची सोय आहे. चंद्रपूरहून गोंडपिपरी, आष्टी, चामोर्शी मार्गे जाता येते. मुल-हरणघाट मार्गे मार्कंडा असाही प्रवास करता येतो. या ठिकाणी पर्यटक व भाविकांसाठी निवासस्थान, भोजन व्यवस्था आदी पर्यटनाच्या दृष्टीने विविध सोयी उपलब्ध करण्यात आल्यास अधिक पर्यटक आकर्षित होतील. हया सोयी करण्यास येथे भरपूर वाव आहे.
चपराळा मंदिर व अभयारण्य
जिल्हा मुख्यालयापासून 70 ते 75 कि.मी. अंतरावर मुलचेरा तालुक्यातील चपराळा हे एक भाविकांच्या श्रध्देचे स्थान आहे. येथे कार्तिक स्वामी महाराजांचे मंदिर आहे. त्याला लागून साईबाबा, शंकर, मारोती इत्यादीचे मंदिर व शिवलिंग आहे. येथे नेहमीच भाविकांची गर्दी असते. महाशिवरात्रीला येथे यात्रा भरते. हनुमान जयंतीला येथे काला व भजन किर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.
मंदिरापासून जवळच वर्धा-वैनगंगा नदीचा संगम आहे. यालाच प्रशांत धाम असे म्हणतात. नदीचे पात्र विस्तीर्ण असून त्यांचे दोन्ही काठ नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहेत. मंदिरासमोरुन आजु-बाजुला घनदाट सागवानाची झाडे व काही चंदनाचे वृक्ष आहेत. या मंदिराच्या परिसरात जंगल असल्यामुळे भाविकांना व पर्यटकांना वृक्ष छायेचा आश्रय घेऊन थांबण्यास अधिक मौज वाटते.

चपराळा हा अभयारण्य असून हा परिसर वन खात्याच्या क्षेत्रात येतो. येथे वनखात्याच्या मार्फत विकास करण्यात येत असून देखरेखीसाठी निरीक्षण कुटी तयार करण्यात आले आहे. यामुळे वन्य प्राण्याचे व वनाचे संरक्षण करण्यास मदत झाली आहे. या अभयारण्यात वाघ, बिबटया, रानडुक्कर, निलगाय, सांबर, चित्ता, हरीण, रानमांजर, कोल्हे, ससे इत्यादी वन्यप्राणी आढळतात शिवाय अनेक जातीचे पक्षी देखील दिसून येतात. 

वनवैभव (ग्लोरी ऑफ आलापल्ली)
गडचिरोली मुख्यालयापासून 110 कि.मी. अंतरावर आणि आलापल्ली पासून केवळ 15 कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. आलापल्लीहून भामरागडला जातांना रस्त्याला लागून वनखात्याच्या मिरातन तलावाजवळ 'वनवैभव आलापल्ली' नावाचे सागवन झाडांनी नटलेले जंगल आहे. सुमारे 7 हेक्टर वनक्षेत्र असून ते राखीव जंगल म्हणून घोषित केले आहे. या ठिकाणी गगणचुंबी सागवन वृक्ष आहेत. 
बिजा, येण, तिवस, बेल, तेंदू, हळद, करम, सिसम इत्यादी जातीचे वृक्ष तेथे आहेत. हे झाडे दोनशे ते अडीचशे वर्षाचे आहेत. सर्वात जास्त गोलाईचे झाड 6 ते 7 मिटर असून लांबी (उंची) 35 ते 40 मिटर इतके आहे. या सागवानी लाकडाचा दर्जा आशिया खंडात उच्च प्रतीचा मानला जातो. इतक्या उंचीचे सागवन वृक्ष हे निसर्गाचे वरदान ठरले असूनही राष्ट्राची संपत्ती आहे. 
येथे वनऔषधी भरपूर प्रमाणात आहे. जंगली मिरची, आवळा, वेलीयुक्त वनौषधी इत्यादी येथील जमिन "साईल क्वालीड" ची आहे व येथे भरपूर प्रमाणात 'हमस' पोषण आहार आहे. हे ठिकाण समुद्र सपाटीपासून 260 मिटरवर आहे. वनवैभवाने नटलेल्या या वनश्रीला जिल्हा भेटी दरम्यान भेट देऊन निसर्गप्रेमी पर्यटक निसर्गरम्य वातावरणाचा मनसोक्त आनंद घेतात.

2 comments:

  1. Tourism च्या दृष्टीने गडचिरोली जिल्ह्यातील आणखी काही सौंदर्यस्थळांचे उल्लेख/माहिती अपेक्षित आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थाच्याकडून आणखी काही मूल्यवान माहिती मिळू शकेल.

    - अनिल मुनघाटे ( ९४०४०८२४०१ )
    नवी मुंबई

    ReplyDelete
  2. मस्त माहिती आहे

    ReplyDelete