Articles

जीवनशैलीतच असावी जलजागृती

13 जून 2016
आपण सारे ज्याची आतूरतेने वाट बघतो असा ऋतू म्हणजे पावसाळा होय. मौसमी हवामानाच्या क्षेत्रात आपला देश आहे. आजही देशातला प्रमुख व्यवसाय शेती आणि शेती आधारित उद्योग असा आहे. आसेतूहिमाचल अशा आपल्या या खंडप्राय देशात भौगोलिक रचनेमुळे सर्वत्र सिंचन सुविधा नाही त्यामुळे पडणारा पाऊस सर्वांसाठी महत्वाचा असतो.
महाराष्ट्रात अनेक भागात चांगला पाऊस होत असला तरी मराठवाडा आणि लगतच्या पश्चिम महराष्ट्राचा भाग हा पर्जन्य छायेच्या क्षेत्रात येतो यामुळे येथे पडणा-या पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यात गेल्या ३-४ वर्षात सातत्याने घट दिसून आली आहे. नागरिकरणाचा वाढता जोर आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता सर्वाधिक प्राधान्य पेयजलासाठी देण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही अशा स्थितीत निर्माण झालेल्या सिंचन सुविधांचा वापर देखील पेयजलासाठी करण्याची वेळ आली आहे.
भूजलाचा मोठया प्रमाणावर होत असलेला उपसा आणि कमी होत गेलेला पाऊस यामुळे पहिली धोक्याची घंटा लातूरमध्ये वाजली. पिण्यास पाणीच नाही अशा परिस्थितीमुळे येथे रेल्वेव्दारे पाणी आणून पाणीपुरवठा करावा लागला. परिस्थितीने निर्माण केलेल्या या आव्हानाचा मुकाबला शासनाने अतिशय चांगल्या पध्दतीने केला आणि लातूरकरांना पाणी उपलब्ध झाले.
असाच काहीसा प्रकार काही वर्षापूर्वी मध्य प्रदेश राज्यातील देवास मध्ये घडला मात्र लोकांनी आपली जबाबादारी मानत पाणी कमावण्याचा निर्धार केला आणि तेथील चित्र अमुलाग्र बदलले. हीच प्रतिक्रिया आपल्या राज्यातही अपेक्षित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारणा-या जलयुक्त शिवार उपक्रमासोबतच मागेल त्याला शेततळे सारख्या उपक्रमांना प्रतिसाद मिळत आहे ही निश्चितपणे चांगली बाब आहे. या निमित्ताने जलजागृती राज्यात सुरू झाली आहे.
आलेला बदल निश्चितच चांगला आहे मात्र त्याही पलिकडे जाऊन येणा-या काळात काम अपेक्षित आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पाऊस पडून सारं आबादानी होईल असं आशादायी चित्र सध्या सर्वत्र आहे. अशा स्थितीत पुन्हा पाण्याचा अमर्याद वापर सुरू होण्याचा धोका आहे. तो टाळणे ही आजची काळाची गरज आहे.
आपण वर्षानुवर्षे जमिनीतून पाण्याचा उपसा करून शेती पिकवली आता त्या धरतीचं ते दान परत देण्याची वेळ आली आहे. पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब कसा जिरवता येईल यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने विचार आणि कृती करण्याची गरज आहे.
जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तयार झालेल्या शेततळयांनी काही प्रमाणात सुक्ष्म सिंचन क्षमता प्रत्येक शेतक-याला निर्माण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शहरांमधून राहणा-या जनतेनेही यात आपला वाटा उचलण्याची गरज आहे. पावसाचं करोडो लिटर पायी वाहून जाताना आपण शहरात बघतो. हा प्रकार आपण कसा रोखता येईल याचा विचार व्हायला पाहिजे.
निसर्ग आपणास जे मुक्तहस्ते देत आहे त्याचा वापर आपण योग्य पध्दतीने केला तर येणा-या काळात आपलंच जगणं सुकर होणार आहे. येणा-या पिढीला आपण निसर्गासोबत कसं जगता येईल याचा वस्तूपार घालून देण्याची गरज आहे.
'रेन वॉटर हार्वेस्टींग' च्या रूपाने निसर्गाचं हे पावसाचं दान धरतीला परत करणा-या इमारती बांधल्या जात आहे मात्र लोकसंख्या आणि भौगोलिक क्षेत्र यांच्या तुलनेत अशा इमारतींचे प्रमाण नगण्य म्हणावे लागेल. छतावर सोलार उपकरणांची मांडणी करून आपण शहरी भागात वीज कमावू शकतो. याच छतावर पडणारं पावसाचं पाणी बेसमेंटमध्ये साठवून वापरण्यासोबतच उर्वरित पाणी आपण बोअरच्या माध्यमातून थेट जमिनीत फेरभरणासाठी देऊ शकतो. धुणी-भांडी करताना वाया जाणारं पाणी शोषखड्डयाच्या माध्यमातून आपण जमिनीत जाईल अशी व्यवस्था करू शकतो त्यामुळे भूजल साठयात वाढच होणार आहे.
निसर्गाच्या जवळ असणे यासाठीच आवश्यक ठरते. यापूर्वीच्या काळात मोटर द्वारे शेतीला पाणी देण्याची पध्दत होती आता वीज आली आणि वीज नसेल तरी डिझेल पंपाच्या माध्यमातून आपण उपसा करतो. यात पाणी अमर्यादपणे उपसले जात आहे. हेच पाणी आपण जुन्या पध्दतीप्रमाणे किंवा नव्या तंत्राने अर्थात ठिबक सिंचनाच्या रुपात शेतीला दिले तर उपशाचे हे प्रमाण ६० ते ७० टक्के इतके कमी होवू शकते.
पाण्याचा योग्य विनियोग आपण करायचं ठरवलं तर खरीप आणि रब्बी सोबत उन्हाळी हंगामात देखील आपण पिक घेऊ शकतो. आता आलेली ही जलजागृती हा आपण जीवनशैलीचा भाग बनवल्यास येणा-या काळात जलसंकट येणार नाही आणि शेतकरी देखील संपन्न होईल ही खात्री आहे.
-प्रशांत अनंतराव दैठणकर
९८२३१-९९४६६

सौंदर्याची अर्थपुर्ण संधी



सौंदर्य आणि काव्य यांचा संबंध कवीला माहिती असतो शब्दांनी सौंदर्याचे वर्णन केलं जातं. ज्या बाबत महिलांची विशेष मक्तेदारी राहिली आहे. त्या सौंदर्याला आजच्या काळात विशेष आयाम लागलेले दिसतात. चूल आणि मूल असं वर्तुळ ओलांडून स्त्री घराच्या बाहेर नोकरीसाठी पडली त्यावेळी सौंदर्याच्या संकल्पनेपेक्षा टापटीप राहण्याला त्यांनी प्राधान्य दिले. प्रत्येकीला नोकरी प्राप्त होणार नाही पण हाच सौंदर्य आणि टापटीपीचा गुणधर्म अनेकांना स्वयंरोजगाराची संधी देत आहे.

नोकरी करण्यासाठी विशेष पात्रतेची आवश्यकता असते. भारताच्या विविध भागात उपलब्ध सोईनुसार आणि क्षमतेनुसार शिक्षण घेणाऱ्‍या प्रत्येक जणीला नोकरी शक्यच नाही पण मनात असेल तर स्वत:च्या पायावर उभे राहणे अर्थात स्वयंअर्थाजन करण्याची संधी "ब्यूटीपार्लर" या उद्योगाने दिली आहे. हजारो जणी यामुळे घरबसल्या आपला कौटुंबिक व्याप सांभाळून अर्थाजन करीत कुटुंबालाही आर्थिक हातभार लावत आहेत. पैशांच्या बाबतीत स्वावलंबी झाल्या आहेत.

सौंदर्य हा स्त्रियांचा खास गुण इतिहासामध्ये क्लिओपात्रा सारखी उदाहरण आहेत. आपल्या महाराष्ट्रात मस्तांनीच्या सौंदर्याचे बखाण केले जाते. मुळात व्यवस्थित राहणे ही स्त्रियांची मूळ प्रवृत्ती त्यातूनच या नव्या व्यवसायाला वाट मिळाली. सौंदर्य प्रसाधनांच्या जोडीला दहापट अशा व्यवसाय संधी संलग्न ब्यूटीपार्लरच्या रुपाने निर्माण झाल्या साधारण लोकसंख्येच्या शहरामध्ये एका किलोमीटरच्या परिघात किमान 10 ब्यूटीपार्लर आज सापडतात असे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.

मोठ्या प्रमाणावरील लोकसंख्या आणि त्याचा सतत विस्तार होतांना वाढत जाणारी मागणी यामुळे पार्लर व्यवसायाची वार्षिक उलाढाल 10 हजार कोटींच्या पुढे पोहचली आहे. यात सातत्याने वाढच होत आहे. ब्यूटीपार्लर हा महिलांना अतिशय सोयीचा व्यवसाय आहे. कौशल्यावर आधारित हा व्यवसाय असल्याने यामध्ये नोकरीप्रमाणे शिक्षणाच्या अटीचा अडसर नाही ही सर्वात मोठी जमेची बाजू आहे. आपल्या उपलब्ध वेळेनुसार आपली उत्पन्नाची उद्दीष्टे ठरवून हा स्वयंरोजगार करणे शक्य आहे.

स्वयंरोजगाराची संधी म्हणून यात सुरुवात करणाऱ्‍या महिलांनी याला स्पा, आरोग्य केंद्र, जीम तसेच मेहंदी आर्ट, टॅटू आर्ट (गोंदनकला) याची जोड देत स्वतंत्र व्यवसायात रुपांतर करुन या स्वरुपाचं कौशल्य असणाऱ्‍या इतर महिलांना रोजगार मिळवून देत महिला उद्योजक म्हणून पुढचं पाऊल टाकलं आहे.

सौंदर्यासाठी प्रसिद्ध अशा आपल्या या देशामध्ये घरात ही स्वयंरोजगार व व्यवसाय संधी वाढीस लागण्यात भारतीय सौंदयवतींना वैश्विक स्तरावर पुरस्कार मिळाल्याने प्रकर्षाने समोर आली. मोठ्या कंपन्यानी यात वाटा उचलला. मात्र यामुळे भारताच्या कानाकोपऱ्‍यात संधी उपलब्ध झाली ही देखील नाण्याची दुसरी बाजू आहे.

सौंदर्य बघणाऱ्‍याच्या नजरेत असतं असं म्हटलं जातं पण सौंदर्याच्या या महासागरात आपलं वेगळेपण उठून दिसावं यासाठी असलेल्या सौंदर्याला "चार चाँद" लावणारी ही व्यावसायिक संधी महिलांना स्वत:च्या पायावर उभी करण्यात सहाय्यक ठरु शकते हे अधिक महत्त्वाचे !
-प्रशांत दैठणकर,
लोकल ते ग्लोबल झालेला गणेशोत्सव
 शतकोत्तर वाटचाल करणारा, महाराष्ट्रीय संस्कृतीच प्रतिबिंब असलेला
घराघरातला गणेशोत्सव लोकल न राहता ग्लोबल झालेला आहे. समाज प्रबोधनाचं
सर्वाधिक प्रभावी साधान असणारा हा उत्सव कला, क्रीडा संस्कृती आणि
अर्थकारणाला चालना देताना काळानुसार बदललेला आपणास दिसतो. त्यामुळे
दुष्काळ व शेतकरी आत्महत्यांबाबत संवेदनशीलता देखील जपत उत्सव साजरा होत
आहे. या गणेशोत्सवाबाबत हे अल्प ग म भ न .........!
- प्रशांत अनंतराव दैठणकर
- 9823199466

सकल कलांचा नायक आणि गणांचा अधिपती असणाऱ्या श्री गणेशाचे आगमन हा
महाराष्ट्रातील घरांमध्ये उत्सवाचा क्षण असतो. भाद्रपद महिन्यात साजरा
होणारा हा उत्सव महाराष्ट्रात विविध ठिकाणी विविध पध्दतीने साजरा होत
असतो. त्याकाळात मोठया प्रमाणावर आर्थिक प्रवाहाला आरंभ होतो. तसेच लाखो
जणांना हाताला काम मिळत असते असा हा उत्सव आणि त्याचे बदलते स्वरुप यावर
बराच खल होत असला तरी याचे स्वरुप आता सामाजिक चळवळीत झाल्याने समाजाचा
फायदा मोठया प्रमाणावर होत आहे.
सण- उत्सवप्रिय अशा संस्कृतीत गणेशोत्सवाचे स्थान आणि मान सर्वात अधिक
आहे. पौराणिक कथा आणि परंपरांवर हिंदू धर्मियांची श्रध्दा अधिक आहे. या
श्रध्देनुसार अग्रपुजेचा मान याचा गणरायाला आहे.
गणपतीचा हा उत्सव आपणास लोकसंग्रहाचे चांगले साधन आहे. यातून सामाजिक
सुधारणांबाबत प्रबोधन करणे शक्य आहे. त्यासोबतच भारतीय स्वातंत्र्यासाठी
जनमानसाला प्रेरित करणे शक्य आहे. अशी भूमिका घेऊन काँग्रेसचे जहाल गटाचे
लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांनी या उत्सवाला सार्वजनिक स्वरुपात साजरा
करण्याचे ठरविले आणि त्यांच्या दृष्टेपणाची प्रचिती नंतरच्या काळात आली.
आज गणेशोत्सवाच्या सार्वजनिक स्वरुपाची शतकोत्तर वाटचाल आपण बघत आहेात.
ज्या मुळ हेतूने हा उत्सव सुरु करण्यात आला ते आपल्या देशाचे स्वातंत्र्य
देखील आपणास दरम्यानच्या काळात प्राप्त झाले. जनमानसात स्वातंत्र्याची
चेतना जागृत करण्यात या उत्सवाला यश आले. आपल्या सत्तेबाबत जागरुक
राहणाऱ्या ब्रिटीश सरकारने सत्तेविरुध्द होणारे प्रत्येक आंदोलन मोडून
काढण्याचा चंग बांधला होता. मात्र स्थानिकांच्या धार्मिक आस्थेत बाधा
आणण्याचा प्रयत्न केला तर आपणास सत्ता सोडावी लागेल हे त्यांना मंगल
पांडेच्या सशस्त्र उठावाने उमगले होते. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवास
त्यांनी विरोध केला नाही.
भारतीय जनता धार्मिक झेंडयाखाली आधी गोळा झाली आणि त्याची वाटचाल
चळवळीच्या रुपाने स्वातंत्र्याकडे झाली. ही किमया घडविण्यात या उत्सवाचा
मोठा वाटा आहे. याबाबत वाद असण्याचं कारण नाही.
पुणे आणि कोकणातला गणेशोत्सव दीड दिवसांचा. त्यानंतर गौरीपूजन गौरीपूजन
इतरत्र 5 दिवस तर कुठे 10 दिवस आणि काही ठिकाणी 11 दिवस हा उत्सव साजरा
होतो. उर्वरित महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या काळात महालक्ष्मी पूजन देखील
होते. कोकणातील गौरीपूजनाचेच हे देशावरले स्वरुप आहे.
कोणताही उत्सव साजरा करताना टिका प्रथम सुरु होते इतके पुरोगामीपण
महाराष्ट्राला लाभले आहे. त्यामुळे या शतकोत्तर वाटचालीत टिकाकारांच्या
टिका लक्षात घेउुन गणेशोत्सवाचे स्वरुप बदलते राहिलेले आहे. याचा इथे
खास उल्लेख करावा लागेल.
समाजात घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब ज्यापध्दतीने वृत्तपत्रे आणि इतर
माध्यमांमध्ये आपणास दिसते त्याच प्रमाणे ते चित्रपटामध्येही दिसते
त्यामुळे समाजातील चाली-रिती आणि परंपरांचे प्रतिबिंब गणेशोत्सवात उमटले
नाही तरच नवल म्हणावे लागेल कारण हा समाजाचा उत्सव आहे. समाजाला जे
रुचते ते इथं प्रतिबिंबीत होत असल्यामुळे या गणेशोत्सवाची लोकप्रियता
वर्षागणिक वाढत आहे आणि त्याचे स्वरुपही बदलत असल्याचे आपणास दिसते.
आरंभीच्या काळात किर्तन आणि भजनांची सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या या
गणेशोत्सवाने काळाच्या प्रवाहात मराठवाडयात प्रसिध्द असणारे " मेळे " इतर
भागात मराठी नाटके, पथनाटये, प्रायोगिक नाटके नंतर संगीत रजनी
ऑर्क्रेस्ट्रॉ 90 च्या दशकात माझ्याच माहिती महासंचालनालयाचा रस्त्यावरचा
सिनेमा, पुढे व्हिडीओची लाट आदी प्रवाह बघितले आणि ते काळानुरुप बदलले.
मनोरंजन हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे याच भूमिकेतून हे कार्यक्रम आयोजित
होत होते.
या मनोरंजनातून महाराष्ट्राला सांस्कृतिक सुबत्ताही लाभली. औरंगाबाद
मधून दिवंगत डॉ. लक्ष्मण देशपांडे सारख्या व्यक्तीने याच मेळयांमधून सादर
केलेले " वऱ्हाड " केवळ लंडनलाच गेलं नाही तर लंडनपासून नजिकच्या
गिनिजच्या बुकातही विश्वविक्रमी एकपात्री प्रयोगाची नोंद केली.
मराठी चित्रपटसृष्टीत आज ज्या नटनटयांचा बोलबाला आहे असे सर्व कलाकार
अजय-अतुल सारखे संगीतकार इतकेच नव्हे तर हिंदी चित्रपट सृष्टीतील
जितेंद्र, जॅकी दादा एक ना अनेक नावे आहेत. ज्यांनी याच गणेशोत्सवाच्या
आधारे आपल्यातील कलावंताला पहिली संधी मिळाल्याचे मान्य केले आहे यात
आघाडीवर मक्या- मंग्या जोडी अर्थात मकरंद अनासपुरे आणि मंगेश देसाई हे
देखील येतात. सांस्कृतिक महाराष्ट्र ही आपल्या प्रांताची खास ओळख आहे
याचा पाया याच उत्सवाने घातला.
गणेशोत्सवाने केवळ मनोरंजन होते का ? याचं उत्तर नाही असं आहे.
मनोरंजनासोबत सामाजिक चळवळीसाठी लाभलेलं गणेशोत्सवाचं योगदान सर्वाधिक
आहे. समाज प्रबोधन करण्यासोबत लाखो जणांना आधार याच उत्सवाने दिला आहे.
या दहा दिवसांच्या कालावधीत भंडारा च्या रुपाने मोठया प्रमाणावर अन्नदान
होते. आज कळीचा मुद्दा आणि काळाची गरज बनलेले रक्तदान देखील
शिबीरांच्या रुपामध्ये राज्यभर होते.
मुंबईत लालबागचा राजा, पुण्यात श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती सारख्या
गणेशोत्सव मंडळांचे सामाजिक उपक्रम वर्षभर सुरु असतात. यात जलजागृती,
ग्रंथालये, पाणी पुरवठा व्यवस्था अनेक पध्दतीने राज्यात असंख्य मंडळे
कार्यरत आहे. हे योगदान टिकाकारांनी लक्षात घ्यावे अशी अपेक्षा असते.
गणेशोत्सवात श्री मूर्ती आणि त्यातील निर्माल्य यामुळे जलप्रदूषणचा धोका
आणि पर्यावरणाचे संकट अशी टिका होताना दिसते. गणेश पूजेत ज्या वस्तूंचा
वापर होतो त्या वस्तू पाने- फुले आणि कापूस अशी असतात. या वस्तू
पर्यावरणात परत घेतल्यास त्यांचे विघटन ( Degradation) होऊन पर्यावरण
संवर्धनास मदतच होत असते.
प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमूळे पाण्याचे प्रदूषण होते याची दखल
राज्यातील सर्व गणेशभक्तांनी घेऊन माती किंवा पर्यावरणात विघटीत होतील
अशाच पदार्थांपासून श्री मूर्ती बनविण्याची चळवळ हाती घेतली आहे.
त्यासोबत शहराशहरातील निसर्गमित्र श्री पूजेचे निर्माल्य जमा करतांना
गेल्या काही वर्षांपासून दिसत आहेत. हा या उत्सवाने स्वीकारलेला बदल
स्वागतार्ह आहेच.
शेतकरी आत्महत्या आणि दुष्काळ यांच्या पाश्वभूमीवर या उत्सवाची चर्चा
सध्या होत आहे. या प्रश्नांबाबत सामाजिक जागृती करण्याचे सर्वाधिक
प्रभावी माध्यम गणेशोत्सव हेच आहे. या उत्सवाने यापूर्वीच्या काळात
केलेले प्रबोधनाचे कार्य खूप मोठे आहे. त्यामुळे समाजातील या दोन्ही
ज्वलंत प्रश्नाबाबत समाजमन तयार करण्याची भूमिका गणेशोत्सव मंडळे जपतील
यात संशय नाही.
या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक सलोखा ही जमेची बाजू आपल्याकडे
वाढलेली आपणास दिसते. माध्यमांच्या प्रसिध्दीच्या केंद्रस्थानी "
सेलेब्रिटी " असणे सहाजिक आहे. परंतु महाराष्ट्रातील गावागावात यामुळे
सामाजिक सौहार्द निर्माण होत आहे. हिंदू-मुस्लीम एकत्रितपणे हा उत्सव
साजरा करतांना दिसत आहे. याखेरीज " एक गांव एक गणपती " चळवळीला वेग
आलेला आपणास दिसतो. यातूनही समाजमन बदलण्यात या गणेशोत्सवाला यश लाभले
आहे.
गणेशोत्सव केवळ सामाजिक सलोख्यापलिकडे अनेक बाबींचे केंद्रस्थान आहे. या
निमित्त हस्तकलेवर अवलंबून असणारे कलाकार, मंडप, लायटींग व्यवसायातील
कलागार पूजा साहित्यामुळे. एकूणच सर्व बाजारातील व्यापार-उदीम यांचा
फायदा होत असतो.
समाजातील प्रत्येकाच्या आयुष्याला चैतन्याची जाणीव करुन देणारा हा
गणेशोत्सव. हा उत्सव ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रीयन आणि मराठी माणसं
आहेत त्या- त्या ठिकाणी पोहचला आहे. हैदराबाद, इंदूर, देशाची राजधानी
नवी दिल्ली इतकी मर्यादा न राहता साता समुद्रापार दुबई, लंडन आणि
अमेरिकेत साजरा होताना दिसतोय. कधीकाळी लोकल असणारा गणेशोत्सव आता
ग्लोबल झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या नावाप्रमाणे येणाऱ्या
सर्व विघ्नांचा अंत करीत हा विघ्नहर्ता सिध्दीदायक होईल या सदीच्छांसह
म्हणूया .. गणपती बाप्पा...मोरया ....!
- प्रशांत अनंतरराव दैठणकर
9823199466


श्रमाला सुगंधाची जोड
गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेला असलेल्या सिरोंचा वन विभागाच्या क्षेत्रात राहणाऱ्या बहुतांश लोकांना उदरनिर्वाहासाठी वनांवर अवलंबून राहावे लागते. तेंदूपानावर आधारित असलेल्या लोकांना आणखी एक आधार देणारी गोष्ट आहे ती हिरव्या सोन्याची. गरिबांचे हिरवे सोने ज्याला म्हटले जाते त्या बांबूचे क्षेत्र सिंरोचा वन विभागात अंदाजे 15 टक्के वनक्षेत्रावर विखुरले आहे. बांबू हा या भागातील उत्पन्नाचा एक महत्वाचा घटक आहे. स्थानिक पातळीवर रोजगार संधींचे निर्माण होऊन लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी वन विभागाने अगरबत्तीसाठी लागणाऱ्या बांबूच्या कमच्या तयार करण्याचे काम स्थानिक पातळीवर सुरु केले. यासाठी लागणारा बांबू वन विभागामार्फत पुरवला जात आहे.
जिल्हा प्रशासनाच्या मदतीने सिरोंचा वन विभागामध्ये 2012 मध्ये अगरबत्ती प्रकल्प राबविण्यात आले. ज्यामध्ये वन विभागात विविध ठिकाणी अगरबत्ती केंद्राची स्थापना करण्यात आली. या केंद्रामध्ये अगरबत्ती काड्या (गोल) आयात कराव्या लागत असत ज्याची किंमत चौकोनी काड्यांपेक्षा जास्त होती. याच काड्या आज गडचिरोलीमध्ये तयार केल्याने स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यात विभागाला यश आले आहे. येथे बांबू चिरून त्याच्या चांगल्या कमच्या करण्यासाठी उपकरण तसेच त्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांना वनामधून निरंतर बांबू मिळावा म्हणून उत्तम नियोजन केले जात आहे.

जिमलगट्टा, येनकांबडा आणि कारंचा या तीन गावात जवळपास 150 टन बांबूच्या विभाजनामागे 7.5 लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिमलगट्टा गावात सुधाकर चिन्ना कामडी नावाच्या व्यक्तीच्या कुटुंबाची दररोजची यापासून मिळणारी कमाई एक हजार रुपये इतकी आहे. सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत त्यांच्या परिवाराला ही कमाई मिळते. जिमलगट्टा येथील लक्ष्मण राजाराम बोरकर म्हणतात की, बांबूच्या विभाजनाच्या कामामुळे त्यांचे संपूर्ण जीवनच बदलून गेले आहे. गावातील लोक आता बांबूच्या विभाजनाची अधिक मागणी करू लागले आहेत. जिमलगट्टा निवासी बापू पोचम कामडी नावाच्या गहस्थांनी बांबूपासून यावर्षीपेक्षा पुढच्यावर्षी आम्ही जास्त पैसे कमवू असा विश्वास व्यक्त केला आहे.
सिरोंचा नंतर झिंगानूर, सोमनपल्ली, जिमलगट्टा, कोपेला आणि असरअल्ली याठिकाणी अगरबत्ती प्रकल्प सुरु झाले. त्यातून 165 महिलांना रोजगार मिळाला. झिंगानूर, सोमनपल्ली, कोपेला ही अगरबत्ती केंद्रे जंगलात एकदम दुर्गम भागात आहेत. याक्षेत्रात असलेली अगरबत्ती केंद्रे हीच येथील स्थानिकांचे बारमाही उत्पन्नाचे आणि रोजगाराचे साधन आहे. येत्या काही कालावधीत वर्धम आणि आमडेली येथे अशीच केंद्र सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. या कुटुंबांसाठी हे अगरबत्ती प्रकल्प वरदान ठरत आहेत. या प्रकल्पात काम करणाऱ्या काही महिला या कुटुंबातील एकमेव कमवणाऱ्या सदस्य आहेत. त्यातून त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तसेच मुलांचे शिक्षण करत आहेत. आम्हाला समाजात मानाचे स्थान मिळण्यामध्ये या कामाचा फार मोठा वाटा आहे असं या महिला सांगतात.
महिलांना अगरबत्ती केंद्रात ये-जा करण्यासाठी सायकली देण्यात आल्या आहेत. २०१३ पासून केंद्राचे उत्पादक गटात रुपांतर करण्यात आल्याने हजारो महिलांच्या हाताला काम मिळाले आहे. सिरोंचा, झिंगानूर, कमलापूर, जिमलगट्टा, असरअल्ली या पाच केंद्रात अगरबत्त्यांची निर्मिती करून महिलांना आजमितीस लाखो रुपयांचा मेहनताना वाटप करण्यात आला आहे..
-डॉ. सुरेखा म. मुळे
वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती)
 मंत्रातय मुंबई

राष्ट्रनिर्मितीत शिक्षकाचं स्थान महत्त्वाचं
भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनी शिक्षक दिन साजरा होतो. 5 सप्टेंबर 1962 पासून हा शिक्षक दिन साजरा करण्यात येत आहे. शिक्षकाचं विद्यार्थ्याशी असणारं नातं औपचारिक पण भावनिक असतं स्पर्धेच्या युगात संपन्न राष्ट्रनिर्मितीसाठी सक्षम युवापिढी घडविण्याचं व्रत या शिक्षकांनी घेतलंय, या निमित्त हा खास लेख.

चला शाळेत जायचंय असं म्हणत ज्यावेळी पालक मुलांना पहिल्या दिवशी शाळेत सोडतात, त्यावेळी त्या बालकाचा चेहरा रडवेला झालेला असतो. आई-वडील आणि कुटुंबाच्या मायेच्या उबेत चालत असणारं बालपण आणि त्याच मोजक्या व्यक्तींच्या भावनिक विश्वाइतकं छोट विश्व असणारा तो जीव. नाही म्हणायला आसपासचे एक दोन सवंगडी इतका वावर असतो. त्या जीवाची जगाची ओळख सुरु होते ती शिक्षकापासून. त्याच्या अंगभूत गुणांना पैलू घडवणारी ही व्यक्ती त्याच्या आयुष्याची दिशा ठरवत असते म्हणूनच शिक्षक आणि त्यांच्यातील गुणांना महत्त्व आहे.

भारतात पूर्वीच्या काळात गुरुकूल संस्कृती होती एका ठराविक वयानंतर घर सोडून गुरुकुलात राहून विद्यार्थीदशेत गेल्यावर जीवनाचं शिक्षण घेतलं जायचं आणि शिष्यातील अंगभूत गुण ओळखून गुरु त्याला त्याच्या अवगत कलेत पारंगत करीत असत. याचा फायदा त्याला जगण्यासाठी होत असे त्यामुळे गुरुला मानाचे स्थान होते.

गुरुर्ब्रह्म.....

असं वचन त्यातूनच आलं. ही हजारो वर्षांची परंपरा ब्रिटीशांनी भारतात सत्ता काबीज केल्यानंतर खंडीत झाली. पुढे एकाच पट्टीत मोजणाऱ्या आणि शिकवणाऱ्या शालेय शिक्षणपद्धतीचा पाया रोवला. इंग्रजांनी आपल्या देशात सत्ता राखायची या हेतूने शिक्षणाची सुरुवात केली. मात्र त्याकाळी दूरदृष्टी असणारे समाजधुरीण, महात्मा जोतिबा फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी या शिक्षणाने समाजाची प्रगती होईल हे जाणून शिक्षणाचा प्रचार प्रसार केला.

समाजातील विरोधाची पर्वा न करता सावित्रीबाईंनी जोतिबांच्या पावलावर पाऊल टाकत मुलींना शाळेपर्यंत आणले यातून गेल्या एका दशकात भारताचं सारं चित्र पालटलं आहे. या शतकभरात शिक्षण आणि शिक्षक यात खूप मोठं अंतर आलंय. खूप बदल झालाय. शिक्षणाचं तंत्र काळानुरुप बदललं आहे. शिक्षण हे जीवनमूल्ये जपणारं असावं असं म्हणतात. मात्र याला काही प्रमाणात 'रॅटरेस', अर्थात स्पर्धेचं रुप आलेलं दिसतंय.

या बदलाचे दृष्य आणि अदृष्य असे अनेक परिणाम आहेत. विख्यात जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन याने प्राण्यांच्या उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. ज्यामध्ये त्याने परिस्थितीशी जुळवून घेणारा सर्वोत्तम ठरतो आणि जो सर्वोत्तम तोच टिकेल असा सिद्धांत प्राण्यांच्या बदलत जाणाऱ्या स्वरुपाबाबत मांडला होता. आजची शिक्षणपद्धती बघताना मला डार्विनच्या सिद्धांताची आठवण होते. Survival of the fittest या सिद्धांतात काही पुढे जातात त्याचं कौतूक होतं इतरांचं काय याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

गुणवंताचे गुणगौरव करताना ती स्पर्धा आपण एका मार्काने जिंकू शकलो नाही यातून वैफल्य येणाऱ्यांचे प्रमाण हल्ली वाढले आहे. शिक्षण घ्यायचं नसून गुणांची शर्यत पूर्ण करायची आहे. यासाठी अभ्यास आणि क्लासेसचा ससेमिरा पाठिशी लागणारी मुलं-मुली थकून जात आहेत. त्यांचे जगण्याचे संदर्भ आणि अर्थ देखील बदलले आहेत. यातून ज्या नव्या पिढीला आपण देशाचे आधारस्तंभ म्हणतो ती पिढी संभ्रमित अवस्थेत आहे. यासर्व बाबींची जाणीव पालकांना तर व्हायलाच हवी आणि शिक्षकांनी देखील याबाबत मंथन करण्याची गरज आहे. यासर्व लिखाण प्रपंचाचा उद्देश हाच की 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. त्यानिमित्त झपाट्याने बदलणाऱ्या जगात शिक्षक कुठे, याचाही विचार व्हायला हवा.

देशात आज जी शिक्षण पद्धती आहे त्यात इतर सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. येथे शिक्षणाचा दर्जा अतिशय चांगला असल्याने इतर राज्यांमधून शिक्षणासाठी येणाऱ्यांचे प्रमाणही अधिक. शालेय शिक्षणस्तरावर शिक्षकांना आनंददायी शिक्षण उपक्रम तसेच इतर उपक्रमाच्या माध्यमातून नवी दिशा दिली जात आहे. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुविधा व सवलतीदेखील दिल्या जात आहेत. आता यापुढील वाटचाल मात्र सर्वांना कौशल्य आधारित शिक्षणाच्या माध्यमातून करावी लागणार हे स्पष्ट आहे.

सर्वांना नोकरी मिळविण्याची इच्छा असली तरी ते शक्य नसते त्यामुळे कौशल्य विकास हे आता शिक्षणात आणावे लागणार आहे. आपला विद्यार्थी कसा आहे, त्याचा नेमका कल काय. याची माहिती शिक्षकांना असते आणि विद्यार्थी देखील शिक्षकांना मानतात त्यामुळे याबाबतीत शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्याला त्याच्या आयुष्याची घडी बसविण्याच्या कामी येऊ शकते. आज आपल्या देशाकडे भावी महासत्ता म्हणून बघितले जात आहे. या पार्श्वभूमीवर महासत्ता होण्यासाठी नव्या पिढीला त्याबाबत सक्षम करण्याची जबाबदारी शिक्षकांचीच आहे.

भावनिक विश्वात देखील विद्यार्थी शिक्षकांना आदराचे स्थान देतात त्यामुळे गुणांच्या स्पर्धेत पिछाडलेल्या विद्यार्थ्यांना मानसिक बळ देण्याची जबाबदारी शिक्षकांवर अधिक आहे. एका परिक्षेमधील अपयश आणि आयुष्यातील यश यातील अंतर विद्यार्थ्यांना सांगून त्यांचं मनोधैर्य वाढवणं आणि मानसिकदृष्ट्या सबळ युवापिढी घडवणं हे देखील शिक्षकच करु शकतात.

शिक्षणाच्या प्रवाहात अनेक स्थित्यंतरे आली आणि येणाऱ्या काळात देखील येतील. पण देशाचे भवितव्य घडविण्यात शिक्षकांचे स्थान आणि शिक्षकांचा वाटा कायम सिंहाचा राहणार आहे.

-प्रशांत अनंतराव दैठणकर
मो. 9823199466
जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली.


 
सूर्याय नम:  सौर ऊर्जाय नम:



निसर्गाने काही बाबतीत कमतरता ठेवली तरी नाण्याची दुसरी बाजू म्हणून काही बाबी मुबलक दिल्या आहेत. याच सकारात्मक भूमिकेतून आता पर्यावरण मैत्रीचा वसा सांगणाऱ्या सौरऊर्जेच्या वापराकडे वळणे ही काळाची गरज आज आहे, याबाबतचा हा खास लेख.

भारताची लोकसंख्या आज 125 कोटींच्या घरात आहे. चीननंतर लोकसंख्येच्या बाबतीत आपला दुसरा क्रमांक लागतो. लवकरच आपल्या लोकसंख्येचा आकडा चीनच्याही जाईल. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या गरजा देखील तितक्याच मोठ्या आहेत. आज अन्नधान्य आणि पाण्याची गरज याच्याच जोडीला सौरऊर्जेची गरज याचाही विचार करावा लागेल. ऊर्जा केवळ वीजपुरवठ्यापर्यंत मर्यादीत नसून ग्रामीण भागात जळतन म्हणून वापरण्यात येणारे वनउपज, त्याने होणारी पर्यावरणाची हानी, वाढते प्रदूषणाचे संकट आपल्याला दिसतील.

यावर उपाय म्हणून सूर्यप्रकाशाकडे पाहणे गरजेचे आहे. पावसाळ्याचे सर्व चार महिने ढगाळ वातावरण नसते त्यामुळे साधारण 365 पैकी 300 दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश उपलब्ध असतो याच्या वापरातून ऊर्जा निर्मिती शक्य आहे. याच भूमिकेतून नविनीकरणीय ऊर्जा धोरणामध्ये नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करुन ऊर्जा निर्मितीला प्राधान्य देणे गरजेचे आहे.

भारतात या बाबीकडे जरा उशीराने लक्ष देण्यात आले असले तरी आता झपाट्याने चित्र पालटताना दिसत आहे. संपूर्ण देशात जुलै 2015 अखेरीस 4097 मेगावॅट ऊर्जा सौरऊर्जेच्या माध्यमातून तयार व्हायला सुरुवात झाली आहे. केवळ 5 वर्षापूर्वी 2010 साली हाच आकडा 161 मेगावॅट इतका होता. यात उल्लेखनीय बाब म्हणजे स्थापित सौरऊर्जेत महाराष्ट्राचा वाटा 9 टक्के इतका म्हणजेच 378.7 मेगावॅट इतका आहे, हे उल्लेखनीय.

देशात सर्वाधिक 24 टक्के सौरऊर्जा गुजरातमध्ये तयार होते. इथे 1000 मेगावॅट ऊर्जा तयार होत आहे. गुजरातमधील चारंका या गावी खास सोलर पार्क उभारण्यात आले आहे. याच धर्तीवर राज्यात महाराष्ट्र राज्य ऊर्जा निर्मिती कंपनी महाजनकोने काम सुरु केले आहे. महाजनको सध्या 125 मेगावॅट ऊर्जा सौरसाधनातून तयार करीत आहे. त्याची क्षमता वाढ करुन ती लवकरच 200 मेगावॅटपर्यंत नेण्याच्या दृष्टीकोणातून काम चालू आहे. राज्यात उस्मानाबादमध्ये टाटा पॉवर कंपनीने 10 मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केलेला आहे.

सौरऊर्जेचा नियमित वापर करण्यात शिर्डी येथील श्री.साईबाबा संस्थान अग्रेसर आहे. या ठिकाणी सौरऊर्जेचा वापर करुन दैनंदिन स्वरुपात 50,000 जणांचे भोजन बनविण्यात येते. या एकट्या ऊर्जा सुविधेमुळे दरवर्षी 1 लाख किलो गॅसची बचत होत आहे, अशा स्वरुपाची गुंतवणूक इतरांनी करण्याची गरज आहे. सौरऊर्जेचा वापर ग्रामीण भागात जिथे वीज पोहोचणे अवघड आहे तेथे सौर कंदिलाचा वापर शक्य आहे. आजमितीस देशात 32 लाख सौरदिवे वाटप व वितरीत झालेली आहेत. याबाबतीत आपला देश आशियात आघाडीवर आहे.

आपणही आपल्या घरात रोज पाणी तापविण्यासाठी सोलर गिझरचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणावर विजेची बचत करु शकतो. प्रारंभी जरा महाग वाटले तरी या तंत्राने वर्षानुवर्षे ऊर्जाबचत करुन पर्यावरणाच्या रक्षणातही आपण आपले योगदान देऊ शकतो. याचे उत्तम उदाहरण कर्नाटकची राजधानी बंगलूरुमध्ये आपणास बघायला मिळते. येथे नागरिकांनी पुढाकार घेऊन सोलर गिझरची जणू चळवळ सुरु केली. याला प्रोत्साहन म्हणून असा वापर करणाऱ्यांना वीज बील दरमहा 50 रुपयांची सवलत दिली जाते. यामुळे एकट्या बंगलूरु शहरात सौर गिझरची ऊर्जा निर्मिती 200 मेगावॅटपर्यंत वाढल्याने तितक्या विजेची मागणी घटली आहे.

तंत्रज्ञानात होणारे बदल आणि वाढती मागणी याचा परिणाम उत्पादनांची किंमत कमी होण्यावर दिसतो 10 वर्षांपूर्वी 1 किलोवॅट ऊर्जेसाठी लागणारी किंमत 18 रुपयांवरुन घटून आता 7 रुपयांवर आली आहे. आणि नागरिकांनी सकारात्मक पद्धतीने सहभाग नोंदविल्यास मागणी वाढून येत्या काळात सौरऊर्जा अधिक स्वस्त असा कायमस्वरुपी पर्याय आपणास वापरता येईल.

याच भूमिकेतून शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर आधारित कृषीपंपांची योजना शासनाने आणली आहे. यामुळे उपलब्ध साधनांचा वापर करुन कठीण काळात शेती व्यवसायात येणारे नैराश्य दूर होऊन आत्महत्येची शेतकरी वर्गातील मानसिकता दूर होण्यास मदत होणार आहे, याचाही लाभ शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे.

कोळशासारखे जैविक इंधन वापरुन ऊर्जा निर्मितीवर आपण आज अवलंबून आहे. या इंधनाला कालमर्यादा आहे. सोबतच यामुळे प्रदूषण अधिक होते. यातून सुटका देणारा पर्यावरणवादी पर्याय सौरऊर्जेने निर्माण केलाय आपणातील प्रत्येकाने याच ऊर्जेचा अधिक वापर केल्यास 2050 पर्यंत आपला देश जगात सर्वाधिक सौरऊर्जा वापरणारा देश होऊ शकतो. त्यामुळेच सुर्याय नम: सौर ऊर्जाय नम:असा मंत्र आगामी काळात म्हणावा लागेल.

-प्रशांत अनंतराव दैठणकर
जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली




श्रावणझुला
श्रावण या शब्दातच एक नाद आहे. हा श्रावण सुरु झाला आणि सोबतच उत्सव-व्रतवैकल्ये यांची महाराष्ट्रीयन परंपरा कामाला लागली. मराठीतला हा श्रावण हिंदीत "सावन का महिना" होय. श्रावणात अनेकविध व्रते ठेवणारी माणसं आहे. श्रावण सणांच्या गर्दीचा तसेच उत्सवांच्या चर्चेचा असतो. निसर्गाचं रुप यावेळी लोभसवाणं गहिऱ्या हिरव्या रंगाचं बनतं.

श्रावण अनेक गोष्टींना साद घालतो. अनेक गोष्टींची आठवण जागवतो. श्रावणाचा हा महिना प्रत्येकासाठी आठवणींचा एक ठेवा आणि आठवणींची ती आठवण असते.

श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडेक्षणा येती सर सर शिरवे, क्षणात फिरुनी उन पडे


बालपणीच्या बालकवींच्या कवितेतील श्रावण दरवर्षी नव्या रुपात आणि नव्या अनुभूतीसह आपल्यासमोर येतो आणि नव्याने जगायला शिकवितो. बालपणाच्या त्या आठवणीमध्ये चिंब भिजलेला श्रावण तारुण्यात त्या भिजण्याची मस्ती नव्याने आणतो. इथं निव्वळ आनंद यापलीकडे एक प्रकारची झिंग मनावर चढवणारा आणि बरसत्या धुंद धारांनी श्रावण भेटतो.

बरसणाऱ्या या श्रावणधारात गेल्या काळावर अगदीच रडावं म्हटलं तर रडून मोकळं करताना निसर्ग आपल्यासवे ताल धरतो आणि त्या बरसण्याचा आणि आधीचं सारं विसरण्याचा तो एक सोहळा ठरतो. सया-सवंगड्यांसह अंगणातल्या लिंबावरचा तो झोका खुणावत असतो कायम आठवणीत आणि श्रावणाच्या आगमनाने पुन्हा झोक्यांच्या उंच भरारीला सुरुवात होते याच श्रावणात. लहानपणीची ती आता बदलली. नववधू प्रिया होवून बावरली त्यानंतर सासरी रुळली तरी माहेरची ओढ तिला असते तिच्या माहेरपणाची वाट घेऊन मग हाच श्रावण त्या वयात नव्याने भेटतो.

श्रावणात येणारे सोमवार आणि शिवलिंग पुजेचं महत्त्व याच्याच जोडीला तिच्या मनात रुजलेली ती मंगळगौर आणि मंगळगौरीची गाणी असतात. जरा मागे वळून बघितलं तर जाणवतं उगाच आपण आयुष्याची गती वाढवून घेतली आहे. घरोघरी होणाऱ्या पूजा आणि त्यानंतर नृत्य आणि गाण्यांनी जागवलेली रात्र पुन्हा जगण्याची उभारी देत असते. इथं वेळ कुठं, वेळ कुठं असं म्हणत देखील त्या आठवणींनी सुखावणाऱ्या नौकरीपेक्षा चाकरमानी महिलांच्या जीवनाचं एक अभिन्न अंग राहिलेला हा महाराष्ट्रीयन ठेवाच आहे.

होडीला पाण्यात टाकून मासेमारीला जाणारा कोळीबांधव देखील निसर्गाच्या नवनिर्मिती चक्राचा आदर करीत माशांच्या प्रजनन काळात मासेमारी बंद करतो आणि नवनिर्मितीचं चक्र पूर्ण झाल्यावर सागराची नारळानं पूजा बांधून श्रावणी पोर्णिमेला नव्यानं मासेमारीला सुरुवात करतो. ती नारळी पोर्णिमा श्रावणातलीच.

नात्यांचे बंध रेशमाचे असावे, असे म्हणतात. कारण त्यातील मुलायमता टिकूनही बंधही मजबूत राहतात असा एक नातेबंध बहिण-भावाचा, आपल्या आयुष्याचा उत्सव करा असा संदेश देणाऱ्या हिंदुस्थानी परंपरेचा आणि संस्कृतीचा एक महत्त्वाचा सण अर्थात याच पोर्णिमेला येणारी राखी पोर्णिमा. बहिणीचं रक्षण कर रे भाऊराया म्हणत या नात्याला रेशमी दोरा बांधून दिलेली औपचारिक आठवण म्हणजे हा सण. भावानं बहिणीचं रक्षण करणं ही आपली संस्कृती. मात्र त्यालाही कुठंतरी प्रतिकात्मक रुपात वर्षात दोन वेळा गुंफलेलं आपणास दिसतं.

जसा श्रावण तुमच्या माझ्या आनंदाचा तसा तो निसर्गाचा देखील निसर्गाच्या साऱ्या साधनांवर आपण जगतो त्याचं ऋण व्यक्त करणं देखील आपण उत्सवी असंच केलंय.

उपद्रवी उंदरांपासून पिकाचं रक्षण करणाऱ्या नागाचं रक्षण शेतकरी बांधवांनी करायलाच हवं. याच वैज्ञानिक दृष्टीकोनाला धार्मिकतेची जोड देऊन साजरी होणारी नागपंचमी हा एक सण. इथं नागाचीही मानानं पूजा केली जाते. तसंच नातं ज्या बैलांच्या जीवावर शेती करतो त्या प्राण्याप्रती देखील आदर व्यक्त करणारा बैलपोळा सण याच श्रावणामधला. याला काही ठिकाणी बेंदूरही म्हणतात. वर्षभर राबणाऱ्या या जीवाला शेतकरी पोटच्या पोराइतकं जपत असतात. हे जगणं कुठंतरी प्रतिकात्मक पद्धतीने दाखविण्याचा हा सण श्रावणाच्या अखेरच्या दिवशी अर्थात श्रावणी अमावस्येच्या दिवशी साजरा होतो.

एकूणच श्रावण सृष्टीला नवं हिरवाईच लेणं घेऊन येतो आणि निसर्गानं दिलेलं हे दान आपण देखील उत्सव म्हणूनच आयुष्याच्या या प्रवासात गाण्यासारखं गात राहतो. श्रावणाची सर आणि श्रावणातली सर इतर कोणत्याही मराठी महिन्याला नाही. त्यामुळे आपणही श्रावणझुला बांधायचा आणि श्रावणाच्या सरीत मनमुराद झोके घ्यायचे.

श्रावणात घननीळा बरसला

रेशीम धारांनी बरसणारा हा श्रावण दरवर्षी नव्या रेशीमगाठी आणि रेशीमबंध असेच गुंफत राहणार. आठवणींना संपन्न करत राहणार.

-प्रशांत अनंतराव दैठणकर
जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली

1 comment:

  1. sir , ekdam nice, all article are knowledgeble, always use for references

    ReplyDelete