Saturday 24 October 2015

3 उपकमांडरसह 7 नक्षल वाद्यांचे आत्मसमर्पण



गडचिरोली दि.24- गडचिरोली पोलिस दलाच्या कार्यक्षमतेमुळे व शासनाच्या नक्षवाद्यांसाठीच्या आत्मसमर्पण योजनेमुळे जिल्हयाचे चित्र बदलत आहे. या अंतर्गत 3 कमांडरसह 30 लाखांचे बक्षीस असणारे 7 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना पोलिस अधिक्षक संदीप पाटील.

या सात जणांच्या आत्मसर्पणामुळे यावर्षी शरण आलेल्या नक्षलवाद्यांची संख्या 35 झाली आहे. यात उल्लेखनीय बाब म्हणजे केवळ 8 महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या पोटके पोलिस ठाणे क्षेत्रातील 15 जहाल नक्षवाद्यांचा समावेश आहे.

पोलिस विभागातर्फे राबविण्यात येणा-या विविध उपक्रम आणि पुनर्वसन योजना यामुळे प्रेरित होवून हे नक्षलवादी आत्मसमर्पणासाठी समोर आले आहेत. असे पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले.

दलम मधील उपकमांडर जानू उर्फ सोमा गोंगलू गोटा याच्यासह राजेश उर्फ कोटेश्वरराव बोरीया कनिती (तेलंगणा) , दलम उपकमांडर निर्मला उर्फ सरिता नरोटे, छत्तीसगडच्या कुत्तुल दलाचा सदस्य श्यामराव उर्फ टांगरु मिसा उसेंडी, रतन मुन्शी कोवासे , सुशीला उर्फ सुखमनी राजू मडावी तसेच रम्मी उर्फ महानंदा मानू पोटावी अशी या आत्मसमर्पित नक्षल वाद्यांची नावे आहेत.

गडचिरेाली जिल्हयात पोलिस दलाने विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली याचा जबर धक्का या नक्षलवादी चळवळीला बसला आहे. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कामगिरीमुळे लोकांचा विश्वास संपादन करणे त्यांना शक्य झाले त्याचा परिणाम या प्रकारच्या आत्मसमर्पणातून सकारात्मक पध्दतीने दिसत आहे.

नक्षलवाद विरोधी उपक्रमासोबतच समाज उपयोगी कार्यक्रम पोलिसदल सातत्याने घेत आहे. आत्मसमर्पण करण्यासाठी पुढे आलेल्या या नक्षलवाद्यांचे समाजाच्या मुख्यप्रवाहात सामिल होण्याच्या दृष्टीकोणातून पुनर्वसन करण्याकडेही विशेष लक्ष पुरविण्यात येत आहे. त्यामुळे नक्षलवादी चळवळीला उतरती कळा लागल्याचे चित्र आता दिसत आहे.

या पत्रकार परिषदेला गडचिरोलीचे अपर पोलिस अधीक्षक मंजुनाथ सिंगे तसेच जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांची उपस्थिती होती.

Monday 19 October 2015

पोलिसांकडून आतापर्यंत 164 नक्षलवाद्यांना कंठस्नान


Ø गत पाच वर्षात राज्यात 52 नक्षलवादी ठार

Ø वर्षभरात देशात 47 साथीदार गमाविल्याची नक्षलवाद्यांची कबुली

नागपूर, दि. 19 – नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात शासनाच्यावतीने राबविण्यात येणारी आत्मसमर्पण योजना चांगलीच यशस्वी होत आहे. त्याचीच फलश्रृती म्हणून गडचिरोलीत आतापर्यंत 483 नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहाची वाट धरली आहे. बंदुका खाली ठेवून आत्मसमर्पण कराल तर स्वागतच, मात्र गोळी चालवाल तर त्याच भाषेत प्रतिउत्तर, अशी रनणीती गडचिरोली पोलिसांनी अवलंबिली आहे. त्यामुळेच पोलिसांना आतापर्यंत तब्बल 164 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. नक्षलवाद्यांच्या गोळीला गोळीनेच उत्तर देणा-या महाराष्ट्र पोलिसांनी गत पाच वर्षांत 52 नक्षलवादी ठार केले आहेत. विशेष म्हणजे गत वर्षभरात देशातील विविध ठिकाणी पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत चळवळीतील 47 साथीदारांना जीव गमवावा लागला, अशी कबुली खुद्द नक्षलवाद्यांनी पत्रकातून दिली आहे.

राज्यातील सर्वाधिक नक्षल प्रभावित जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. अतिसंवेदनशील असलेल्या या जिल्ह्याला छत्तीसगड, आंध्रप्रदेश या राज्याची सीमा लागली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल असल्यामुळे येथे नक्षली कारवाया होतात. गत काही वर्षांपासून शासनाने नक्षल चळवळ मोडून काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. नक्षल चळवळीत भरकटलेल्या तरुण-तरुणींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबरोबरच जंगलात पोलिसांनी विशेष रणनिती, जंगल युध्दनिती आणि गणिमीकाव्याचा अवलंब केल्यामुळे नक्षलवाद्यांना सळो की पळो करून सोडले आहे.

गडचिरोली हा जिल्हा 1982 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा झाला. शेजारच्या आंध्रप्रदेशातून महाराष्ट्रात 1980 च्या दशकात नक्षलवादाचा प्रवेश झाला. जिल्ह्याची स्थापना होण्यापुर्वीच या भागात नक्षल चळवळ हळूहळू आपले पाय पसरत होती. याला प्रत्युत्तर देण्यासाठी शासनाने विशेष अभियान राबवून नक्षल चळवळ मोडून काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या भागात पोलिसांकडून सर्वात पहिला नक्षलवादी 2 नोव्हेंबर 1980 मध्ये मारला गेला. तत्कालीन चंद्रपूर जिल्ह्यातील मोयाबीनपेठा या ठिकाणी राज्य राखीव पोलिस दलासोबत झालेल्या चकमकीत शिरपूर दलम कमांडर पेद्दी शंकर हा पोलिसांच्या गोळीचा पहिला निशाणा ठरला.

त्यानंतर चार-पाच वर्षे पोलिसांना फारसे यश मिळाले नाही. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पोलिसांनी नक्षलवाद्यांविरूध्द आघाडी उघडली. 1986 मध्ये एक नक्षलवादी, तर दुस-या वर्षी 1987 मध्ये दोन नक्षलवाद्यांना पोलिसांनी यमसदनी पाठविले. नक्षलवादी गरीब आदिवासींचा ढाल म्हणून उपयोग करीत असल्यामुळे काहीवेळा पोलिसांसमोर अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे आदिवासी नागरीकांचे रक्षण करून नक्षलवाद्यांना टिपणे, पोलिसांसमोर एक आव्हान होते. या आव्हानाला स्विकारून पोलिसांनी नक्षल्यांविरूध्द आपली लढाई निरंतर सुरू ठेवली आहे.

दिवस-रात्र जंगल पिंजून काढत पोलिसांनी नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यास सुरूवात केली. सन 1986 ते 1990 या पाच वर्षांत पोलिसांनी 5 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. सन 1991 ते 1995 या पाच वर्षात तब्बल 38 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. सन 1996 ते 2000 या कालावधीत 7 नक्षलवादी, सन 2001 ते 2005 या काळात 17 नक्षलवादी ठार झाले. विशेष म्हणजे 12 ऑक्टोबर 2004 मध्ये नक्षल्यांनी देवसुर रोड येथे पोलिसांना मारण्यासाठी भुसुरूंग ठेवत असतांना त्याचा स्फोट झाल्याने एका नक्षलवाद्याचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. सन 2006 ते 2010 या काळात 44 नक्षलवादी तर गत पाच वर्षांत म्हणजे सन 2011 ते 30 सप्टेंबर 2015 या कालावधीत सर्वाधिक 52 नक्षलवाद्यांना पोलिसांनी यमसदनी पाठविले आहे. यात सन 2011 मध्ये 7 नक्षलवादी, सन 2012 मध्ये 4 नक्षलवादी, सन 2013 मध्ये सर्वाधिक 26 नक्षलवादी, सन 2014 मध्ये 13 आणि चालू वर्षी 30 सप्टेंबर 2015 पर्यंत ठार झालेल्यांमध्ये दोन नक्षलवाद्यांचा समावेश आहे. यावर्षी 6 सप्टेंबर 2015 रोजी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत प्लाटून क्र. 3 चा उपकमांडर प्रमोद उर्फ मैनु पोटावी (रा. पेंदूलवाही, ता. ऐटापल्ली) आणि कंपनी क्र. 10 चा सदस्य कुम्मे उर्फ रंजू उर्फ जिजा मज्जी (रा. मिडदापल्ली, ता. भामरागड) ठार झाले. तसेच पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत आतापर्यंत 50 च्यावर नक्षलवादी गंभीर जखमी झाले आहेत.

नक्षल चळवळीचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोलीत आता शासन आणि पोलिसांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम आणि विकासात्मक योजनांची पायाभरणी होत आहे. त्यातच पोलिस दलाची सतर्कता आणि सक्षमीकरण या माध्यमातून नक्षल चळवळीचा बिमोड करणे, भरकटलेल्या युवकांना आत्मसमर्पणाचा मार्ग दाखवून त्यांचे पूनर्वसन करणे व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणेदेखील सुरु आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून जिल्ह्याची प्रतिमा सुधारण्याच्या दृष्टीने सकारात्मक असा परिणाम दिसत आहे.
  
अ.क्र.
वर्ष
ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या
1
सन 1980 ते 1985
1
2
सन 1986 ते 1990
5
3
सन 1991 ते 1995
38
4
सन 1996 ते 2000
7
5
सन 2001 ते 2005
17
6
सन 2006 ते 2010
44
7
सन 2011 मध्ये
7
8
सन 2012 मध्ये
4
9
सन 2013 मध्ये
26
10
सन 2014 मध्ये
13
11
30 सप्टेंबर 2015 पर्यंत
2
                                                       0000000000000

Friday 2 October 2015

विद्यापीठे ही नाविण्य व संशोधन केंद्रे व्हावी ना- सुधीर मुनगंटीवार

गोंडवाना विद्यापीठाचा चौथा स्थापना दिन उत्साहात

गडचिरोली, दि.2: विद्यापीठे ही केवळ शिक्षणाची केंद्र न राहता ती नाविण्य आणि संशोधनाची ठिकाणे बनली पाहिजेत असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या चौथ्या स्थापनादिन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगूरु डॉ. एन. व्ही. कल्याणकर हे होते. कार्यक्रमात जिल्हयाचे खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे, माजी कुलगुरु डॉ. कीर्तीवर्धन दिक्षीत तसेच कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यापीठाच्या स्थापनेसाठी चंद्रपूर की गडचिरोली असा विचार असतांना मनातील व्दंव्द बाजूला सारुन आपण गडचिरोलीला प्राधान्य दिले. असे सांगतांना मुनगंटीवार यांनी विधानसभेत विद्यापीठ स्थापनेचा कसा पाठपुरावा आपण केला याची आठवण या प्रसंगी सांगितली.
विद्यापीठाला वाढीव जागा लागणार आहे त्यासाठी लगतच्या एमआयडीसी सह खाजगी जागांच्या मालकांशी चर्चा करुन ती जमीन खरेदी करण्याची शासनाची तयारी आहे. प्रसंगी बाजार भावाने जागा खरेदी करुन ती आपण विद्यापिठाला उपलब्ध करुन देवू अशी ग्वाही याप्रसंगी त्यांनी यावेळी दिली. 2003 साली या विद्यापिठाच्या स्थापनेसाठी तत्कालिन मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्याशी झालेली आरंभिक चर्चा आणि विद्यापिठ स्थापनेत गडचिरोलीचे माजी पालकमंत्री दिवंगत आर.आर.पाटील आणि शिक्षण व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी सहकार्याची आणि सकारात्मक भूमिका ठेवली होती. याचीही आठवण त्यांनी या भाषणात केली.
येणा-या काळात विद्यापिठात चालणा-या अभ्यासक्रमात थेट कार्पोरेट जगतामधील गुंतवणूक व्हावी यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. यासाठी भारतामधील आघाडीच्या 100 उद्योगांच्या प्रमुखांची एक बैठक लवकरच महामहिम राज्यपालांनी घेण्याचे आयोजन करण्यात आले आहे. याव्दारे विद्यापिठातील विद्यार्थ्यांवर थेट गुंतवणूक येणा-या काळात होईल असेही ते म्हणाले.

विदर्भ विकासाचा अनुशेष भरुन निघावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह आपण कटिबध्द आहोत याचाच एक भाग म्हणून गडचिरेाली -मूल -चंद्रपूर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसित करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. सोबतच येणा-या काळात सिरोंचा ते भामरागड हा मार्ग देखील राष्ट्रीय महामार्ग करण्यात येईल. अशी घोषणा त्यांनी याप्रसंगी केली.

विद्यापीठाला सभागृह गोंडवाना विद्यापीठाच्या परिसरात 800 आसन क्षमतेचे वातानुकूलीत सभागृह येत्या 2 वर्षात व्हावे यासाठी साडेपाच कोटी रुपयाचा प्रस्ताव विद्यापीठाने द्यावा आपण तो निधी देऊ अशी घोषणा अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी केली. यासोबत गडचिरोली शहरामध्ये एक सुसज्ज असे नाटयगृह बनविण्यात येईल असेही त्यांनी यावेळी जाहिर केले.
विद्यापीठाच्या शैक्षणिक दर्जामध्ये कोणतिही तडजोड करण्यात येऊ नये असे सांगुन हे विद्यापीठ आगामी काळात नामांकीत संशोधक तयार करेल. अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. जगभरात ख्यातनाम 200 शैक्षणिक संस्थांमध्ये भारतामधील एकही संस्था नाही. याबाबतचा अहवाल राज्यपालांच्या एका बैठकीत सादर करण्यात आला याची खंत व्यक्त करुन ते म्हणाले की, इमारत आणि सुविधांनी विद्यापीठ होत नाही तर ते संशोधनाने तयार होते. अशा प्रकारचे संशोधन या विद्यापीठात करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सुचना त्यांनी या प्रसंगी केल्या.
विद्यापीठामध्ये जे अभ्यासक्रम सुरु आहेत त्याच्याच जोडीला तांत्रिक अभ्यासक्रम विद्यापीठ स्तरावर सुरु करण्यात येतील असे कुलगुरु डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. विद्यापीठात शिक्षण घेतांना याच भागात रोजगार प्राप्त होईल अशा अभ्यासक्रमांना येणाऱ्या काळात प्राधान्य दिले जाईल असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणारे पालकमंत्री अंब्रीशराव आत्राम या कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाहीत याप्रसंगी त्यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे आदींची यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. ईश्वर मोहुर्ले यांनी केले तर डॉ. एस. एम. रोकडे यांनी आभार प्रदर्शन केले.