Wednesday 23 December 2015

डॉ. प्रकाश आमटेंशी संवाद....!

बुधवार, २३ डिसेंबर, २०१५



‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ हे नाव आता सगळ्या जगालाच माहिती झालं आहे. त्यांच्या कार्याबाबत सर्वांना उत्सुकता आणि कुतूहल असल्याने महाराष्ट्राच्या टोकावर असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथील त्यांच्या घरी निवांत क्षणी त्यांच्याशी महान्युजने संवाद साधला.

प्रश्न :- आजपर्यंतच्या या प्रवासात आपण हा भाग वेगवेगळ्या टप्प्यात बघितला आहे. हा प्रवास नेमका कसा झाला?
उत्तर :- 42 वर्षांपूर्वी या ठिकाणी आम्ही आलो त्यावेळी इथं सारं जंगल होतं. प्रवासही सोपा नव्हता. मुळात त्यावेळी आलापल्लीच्या पुढे भामरागडपर्यंत रस्ताच नव्हता. मोठ्या बारमाही नद्या आणि या ठिकाणी पोहचण्यात खूप अडचणी होत्या. या ठिकाणी आल्यावर आमच्या पैकी कुणालाही स्थानिक भाषा बोलता येत नव्हती. या भागात शिक्षणाचा अभाव असल्याने मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा होती. घनदाट जंगलं आणि पाणि यामुळे पोटासाठी खायला काही नसलेली मंडळी येथे होती.

डॉ. प्रकाश आमटे यांच्याशी संवाद चालु असतांना माझ्या डोळ्यासमोर सत्तरच्या दशकातला काळ उभा राहिला. त्यावेळी गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झालेली नव्हती. त्यावेळी हा चांदा अर्थात चंद्रपुर जिल्ह्याचाच भाग होता. आताच्या रचनेत गडचिरोली हे नागपूरपासून 180 किलोमीटर अंतरावर आहे. आणि हेमलकसा गडचिरोलीपासून 180 किलोमीटर अंतरावर आहे. आलापल्ली मार्गे जावे लागते. आलापल्ली अणि गडचिरोली अंतर 120 किलोमीटर आहे. त्याकाळी पुढील साठ किलोमीटर अंतरासाठी रस्ता नव्हता आणि आजही सायंकाळी सहा नंतर जाण्यास किंवा येण्यास बस नाही. तसेच विस्तीर्ण नदीपात्र आणि येणारा पुर यामुळे संपुर्ण पावसाळ्यात भामरागड-हेमलकसाचा जगाशी संपर्क आजही तुटून जातो.

प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी पुढे सारा प्रवास उलगडला, परंतु त्यापूर्वी एक रुग्ण तेथे घेऊन दवाखान्यातून एक्स-रे सह एक सहाय्यक आला. डॉक्टरांचा मुलगाही तेथेच होता. त्या आदिवासी तरुणाचा खांदा निखळला होता. त्याच्या एक्सरे वरुन अंदाज घेऊन त्यांनी त्याला माडिया भाषेत समजावले आणि खाली झोपवले. केवळ दोनच मिनीटांत आपल्या पायाने खांदा आणि छाती जवळ दाब देत हाताला एक जोरदार झटका दिला आणि त्याचा खांदा जोडला गेला. त्याला काळजी घेण्यास सांगून पुढचा संवाद सुरु झाला.

प्रश्न :- या भागात माडिया आणि गोंड आदिवासी राहतात. गोंडी भाषेला किमान लिपी तरी आहे. माडिया भाषेला लिपीच नाही. अशा स्थितीत आदिवासी लोकांशी आपण संवाद कसा साधला?
उत्तर :- आरंभी ते अवघड आहे आणि होतं, मात्र संवाद करतांना प्रथम खाणा-खुणा आणि त्यातून मराठीत अमूक शब्द आहे त्याची खूण दाखवून माडियात काय म्हणतात त्याचे उच्चारण शिकणे असा प्रवास करीत अदिवासींशी संपर्क झाला. आसपासच्या गावात आजारी पडल्यावर प्रथम पुजाऱ्याकडे न्यायची पद्धत होती आता ती पुर्ण संपली असं नाही पण उपचारासाठी कुणीच येत नाही अशा स्थितीत बराच काळ गेला. एका पुजाऱ्यासोबत चांगलाच वाद झाला. पण पहिला रुग्ण आला त्यानंतर काही प्रमाणात आदिवासींमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण झालं आणि हळू हळू इथलं काम वाढत गेलं. माणसंही स्वत:हून पुढं आली. या भागात वैद्यकीय उपचार आता चांगल्या पद्धतीने देता येतील असं रुग्णालय आणि परिसरात राहण्याची व्यवस्था.. असं करत हेमलकसा वाढत गेलं.

वाचकांना सांगता येईल की येथे तीन किलोमीटरवर भामरागड आहे. त्याठिकाणी पामुलगौतम, पर्लकोटा आणि इंद्रावती नद्यांचा संगम आहे. विस्तीर्ण अशा संगमाच्या दुसऱ्या बाजुला डोंगर रांगा आहेत. तेथून छत्तीसगढ राज्य सुरु होते. नदी पार करायला डोंग्यातूनच प्रवास करावा लागतो. छत्तीसगढ मधील आदिवासी रुग्ण देखील येथे येत असतात.

प्रश्न :- या भागात आतापर्यंतच्या कामातला नेमकेपणाने अनुभव काय?
उत्तर :- या भागात आता लोक इथपर्यंत उपचाराला येतात परंतु वीज नसल्याने अर्धा अधिक काळ समस्या निर्माण होत असते. आता आजारी पडल्यावर गावच्या पुजाऱ्याकडे न जाता दवाखान्यात उपचार करावे हा विचार आदिवासींना पटलाय. आदिवासी मुलांना शिक्षणासाठी इथं सोय करु शकलो यामुळे आता त्यातही वाढ होत आहे. दलदल व जंगल अधिक असल्याने डासांचा उपद्रव ही इथली सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे पावसाळ्यात साथीचे रोग पसरतच असतात.

पुढे संवाद सुरु राहिला. नंतर मग त्यांच्या सोबत पहिल्या पासुन काम करणारे नांदेडचे जनार्दन मचकन यांच्या सोबत लोकबिरादरीचा तो विस्तीर्ण परिसर आणि त्यात असणारे प्रकल्प बघितले. जिथे आजही विषारी साप ‘कॉमन’ गोष्ट आहे. नद्यांमध्ये मगरी आहेत. अशा या हेमलकसात 42 वर्षात काय काय बदल घडले. हे जनार्दनराव सांगत सोबत फिरले.

जिल्ह्यात रुजू झाल्यावर असा निवांत भेटीचा उपक्रम करायचाच असा विचार केलेला. तो योग आज आला. आता पुन्हा कोणत्यातरी निमित्तानं भेटूच, असा निरोप घेत आम्ही त्रिवेणी संगमावरच्या प्रेक्षणीय सूर्यास्ताकडे धाव घेतली.


- प्रशांत अनंतराव दैठणकर
9823199466

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.



Saturday 5 December 2015

जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोली च्या घडीपत्रिकेसह जिल्हाधिकारी रणजित कुमार आणि पीसीपीएनडीटी समितीचे सदस्य

Saturday 21 November 2015

गडचिरोलीत उद्योग यावेत याबाबत शासन आग्रही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मोहोर्ली ताडोबा चंद्रपूर : गडचिरोलीत उद्योगांनी यावे असे प्रयत्न आपण करीत आहोत. मात्र केवळ कच्चा माल घेण्यापुरते न येता या ठिकाणी कौशल्य प्रशिक्षण देऊन स्थानिकांना रोजगार संधी प्राप्त व्हावी यासाठी याच ठिकाणी प्रक्रिया उद्योग देखील उभारण्याची अट त्यांना असेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

वन विभाग अधिकाऱ्यांची दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते.

गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी आपले शासन कायमच आग्रही राहिलेले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. आपल्या लंडन दौऱ्यात उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांची त्यांनी भेट घेतली. त्याबाबत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते.

गडचिरोलीत मुबलक असे आयर्न ओर आहे. ज्याच्या प्रक्रियेतून कार उद्योगाला लागणाऱ्या स्टीलची निर्मिती होऊ शकते. महाराष्ट्र सध्या ऑटोमोबाईल हब बनलेला आहे. या पार्श्वभूमीवर येथे या उत्पादनाला मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने असे उद्योग सुरु होऊ शकतात. यात ते उद्योग याच भागात सुरु करण्याची अट राहील, असे ते म्हणाले.

गडचिरोली जिल्हा घडीपुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमोचन

चंद्रपूर : राज्याच्या वर्षपूर्तीनिमित्त गडचिरोली जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने काढण्यात आलेल्या 8 पानी विशेष घडीपत्रिकेचे विमोचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी झाले.

ताडोबा येथील मोहर्ली या गावात मुख्यमंत्री वनविभागाच्या एका कार्यशाळेच्या समारोपास आले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत हे विमोचन झाले. गडचिरोलीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी घडीपत्रिकेबाबत मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांना माहिती दिली.

यावेळी व्यासपीठावर आमदार नानाभाऊ शामकुळे, संजय धोटे, किर्तीकुमार भांगडिया, महापौर राखी कंचर्लावार तसेच प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक ए.के.निगम व श्री.भगवान आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

गडचिरोली जिल्ह्यात नव्या शासनाच्या वर्षभरात झालेल्या कामांचा आढावा या घडीपत्रिकेच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. आठ पृष्ठांची सचित्र घडीपत्रिका जिल्ह्यात विविध क्षेत्रात झालेल्या विकास कामांचा परिचय देते.

अतिदुर्गम आणि राज्याच्या सिमावर्ती भागाच्या या जिल्ह्यात नक्षल चळवळीचा उपद्रव आहे. याचा मुकाबला शासनाने उत्तमरित्या केला आहे. या ठिकाणी पोलीस दलातर्फे राबविण्यात आलेल्या नक्षलवाद्यांसाठीच्या आत्मसमर्पण योजनेत या वर्षभराच्या कालावधीत 35 जणांनी प्रतिसाद देऊन नक्षलवादाचा मार्ग सोडला.

आत्मसमर्पण करणाऱ्‍या नक्षलवाद्यांचे पुनवर्सन आणि नक्षलवादी व त्यांच्या कुटुंबियांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना देण्यात येणारे अर्थसहाय्य तसेच कौशल्य प्रशिक्षण याबाबतची माहिती यात आहे.

या जिल्ह्यात असणाऱ्‍या आदिवासी कुटुंबातील शिक्षण घेणाऱ्‍या मुला-मुलींना जगाचा परिचय व्हावा या उद्देशाने पोलीस दल महाराष्ट्र दर्शन सहल आयोजित करते. या विद्यार्थी सहलीतील मुलांशी मुख्यमंत्र्यांची भेट आणि त्याबाबतची इतर माहिती या घडीपत्रिकेत आहे.

जिल्ह्यात जलयुक्त शिवारअंतर्गत मोठ्या प्रमाणावर सिंचन संदर्भातील कामे झाली. या माध्यमातून संरक्षित जलसिंचन क्षमता या जिल्ह्यात निर्माण झाली आणि त्यामुळेच एका पिकावर समाधान मानणाऱ्‍या या जिल्ह्यात आता दुसऱ्‍या हंगामात पिके घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या जलयुक्त शिवारअंतर्गत झालेल्या कामांचा सचित्र आढावा यामध्ये घेण्यात आला आहे.

अतिदुर्गम अशा या जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र वनांनी व्यापलेले आहे आणि सर्वाधिक लोकसंख्या आदिवासींची आहे. या वनांचे सरंक्षण करताना याच्या माध्यमातून येथील स्थानिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी वनविभाग कार्य करीत आहे. याचाच एक भाग म्हणून बांबूवर आधारित उद्योग, अगरबत्ती प्रकल्प आदी जिल्ह्यात आहेत. ही या जिल्ह्याच्या दृष्टीने एक यशकथाच म्हणावी लागेल. याचीही सचित्र माहिती यात सामील आहे.

Tuesday 17 November 2015

गडचिरोलीच्या विकासाची बांधिलकी !

राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि श्रीलक्ष्मी मीत्तल यांच्या भेटीच्या प्रसंगीचे छायाचित्र
गडचिरोली सारख्या अतिदुर्गम भागाचा विकास हे खूप मोठं आवाहनात्मक काम आहे. यात उद्योग व्यवसाय आणि दळण-वळणाची साधने वाढवून जलदगतीने विकास साधणं शक्य आहे. याचा पूर्ण अभ्यास करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रत्येक कृतीतून या भागाच्या विकासाप्रती असणारी आपली बांधिलकी वेळोवेळी स्पष्ट केली आहे. सध्या इंग्लंड दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात याचीच प्रचिती आलेली आहे.
विस्ताराने राज्यात सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा हा जिल्हा वनसंपत्ती आणि खनिजांनी समृध्द असा जिल्हा आहे. वर्षभरापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी प्राधान्यक्रमाने जिल्हयाचा दौरा करुन या जिल्ह्याच्या विकासाची निकड असल्याची जाणीव सर्वांनाच करुन दिली होती.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याच्या आदिवासी विकासाचे राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांच्याही कडून या जिल्हयाच्या विकासाला गती मिळाल्याचे चित्र गेल्या वर्षभराच्या कालावधीत दिसत आहे.

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करुन जिल्हयात रस्त्यांचे जाळे कसे विस्तारीत करता येईल याबाबत बैठका घेऊन या संदर्भातील आराखडा त्यांनी अंतिम करवून घेतला. या माध्यमातून हा जिल्हा देशाच्या इतर भागांशी चारपदरी राष्ट्रीय महामार्गांनी बनण्याचा मार्ग आता खूला झाला. यामध्ये साकोली-वडसा-गडचिरोली-आलापल्ली ते सिरोंचा हा मार्ग महत्वाचा आहे. साधारण 250 किमी लांबीचा हा महामार्ग जिल्हयाला पूर्णपणे बदलून टाकणारा ठरेल हे आता स्पष्ट झाले आहे. जिल्हा मुख्य राष्ट्रीय महामार्गाच्या नकाशावर आल्याने याठिकाणी येणाऱ्या काळात मोठया प्रमाणावर बदल दिसतील व जिल्हा झपाटयाने विकसित होईल यात शंकाच नाही.

याच पध्दतीचा पाठपुरावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी देसाईगंज (वडसा) - गडचिरोली रेल्वे मार्गाबाबत केल्याने या रेल्वे मार्गाच्या कामालाही गती मिळाली. केंद्र आणि राज्य यांच्या 50:50 टक्के भागीदारीतून निर्माण होणाऱ्या या मार्गासाठी राज्याचा वाटा केवळ मंजूर केला असं नाही तर त्याची तरतूदही या वर्षीच्या अर्थसंकल्पात झाली हे उल्लेखनीय.

दिवाळीच्या पूर्वसंध्येस या मार्गाबाबत निविदापूर्व चर्चा देखील झाली. या मार्गाचे काम येत्या 3 वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे. असे झाल्यास गडचिरोली देशातील सर्वच भागांना जोडले जाईल आणि या जिल्हयातील प्रत्येकाचे गडचिरोली-मुंबई थेट रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात येईल. याची मुहूर्तमेढ आता रोवली गेली आहे. राज्यात वर्षपूर्ती केलेल्या शासनाने गडचिरोली वासीयांना दिलेली ही सर्वात मोलाची भेट ठरली आहे.

विदेश दौऱ्यात उद्योजकांच्या भेटी घेऊन त्यांना महाराष्ट्रात उद्योग उभारणी करण्यासाठी प्रेरित करणे हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे खास वैशिष्ट्य आहे. या कामातही त्यांची गडचिरोली जिल्हयाच्या विकासाची बांधिलकी दिसली. जग ज्यांना स्टील उद्योगाचे "किंग" म्हणून ओळखते अशा लक्ष्मी मित्तल यांना गडचिरोलीत उद्योग सुरु करण्याबाबत आग्रहीपणाने सूचविले.

 गडचिरोली जिल्हयात वनसंपत्ती सोबत लोहखनिज मुबलक प्रमाणात आहे. जिल्हयातील सूरजागड भागात याची उपलब्धता अधिक आहे. त्यामूळे या भागात स्टील उद्योगाची उभारणी सहजशक्य आहे. त्याच्या जोडीला रस्ते आणि रेल्वेचे जाळेदेखील उभे राहत आहे. त्यामुळे उद्योग उभारणी अधिक सुकर होणार आहे.
 
दिनांक: 17 नोव्हेंबर 2015
प्रशांत अनंतराव दैठणकर
जिल्हा माहिती अधिकारी
गडचिरोली
9823199466

Tuesday 3 November 2015

राज्य व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये कोल्हापूरला 2 औरंगाबादला 1 विजेतेपद

मुंबई, दि.3- राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धाच्या आयोजनातून गडचिरेाली जिल्हयाने आपली क्षमता दाखवली आहे. येणा-या काळात जिल्हयात खेळाडूसाठी तालुकास्तरापर्यंत सुविधा व प्रशिक्षक उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करु असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांनी केले.

गडचिरोलीतील गोंडवाना सैनिक शाळेच्या मैदानावर राज्यस्तर व्हॉलीबॉल स्पर्धेच्या बक्षीस वितरणात ते बोलत होते. स्पर्धेत 19 वर्षाखालील गटात औरंगाबाद विभागाने तर उर्वरित 2 गटात कोल्हापूर विभागाने जेतेपद प्राप्त केले.
अंतिम सामन्याची १९ वर्षाखालील गटातली लढत चांगलीच रंगली

स्पर्धेच्या 19 वर्षाखालील वयोगटात औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, सासवड संघाला पराभूत केले.

या पुरस्कार वितण सोहळयाच्या अध्यक्षस्थानी गडचिरेालीचे जिल्हाधिकारी रणजीतकुमार हे होते कार्यक्रमास आमदार डॉ. देवराव होळी , नागपूर विभागाचे क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर, गडचिरोली क्रीडा परिषद सदस्य व गडचिरोली जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर , जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

स्पर्धाचा सविस्तर निकाल खालीप्रमाणे

वयोगट 14 वर्षे
विजेता संघ - कोल्हापूर विभाग, विश्वास विद्यानिकेतन , चिखली , ता. शिराळा, जि. सांगली

उपविजेता संघ- नाशिक विभाग, ब्राईट इंग्लीश मिडीयम स्कुल , शिंदखेडा जि. धुळे

तृतीय स्थान - मुंबई विभाग, जी.एस. पी.एम. ऋषीकूल विदयालय मुंबई

वयोगट 17 वर्षे

विजेता संघ- कोल्हापूर विभाग , विश्वास विद्यानिकेतन ,चिखली

उपविजेता संघ- पूणे विभाग , सिम्बॉयसीस स्कूल ,पूणे4

तृतीय स्थान - अमरावती विभाग, न्यू इंग्लीश हॉयस्कुल आणि ज्यूनिअर कॉलेज ,अकोला

वयोगट 19 वर्षे
विजेता संघ - औरंगाबाद विभाग , डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय ,औरंगाबाद

उपविजेता -पूणे विभाग, पुरंदर ज्यु. कॉलेज सासवड

तृतीय स्थान - कोल्हापूर विभाग , विदयामंदिर हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज ,इस्लामपूर , सांगली

Sunday 1 November 2015

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा गडचिरोलीत शानदार शुभारंभ


गडचिरोली, दि.1-राज्याच्या आठ विभागातून आलेल्या विद्यार्थ्यांचे लयबध्द संचलन आणि विविध रंगानी सजलेली मैदाने अशा शानदार पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आणि निवडचाचणी स्पर्धेचे आज एका दिमाखदार सोहळयात गडचिरोली येथे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

गडचिरोली येथील गोंडवाना सैनिक शाळेच्या मैदानावर या स्पर्धा होत आहेत. राज्याच्या आठ विभागातील 14, 17 व 19 वर्ष वयोगटातील गट निहाय प्रत्येक आठ असे एकूण 24 संघ यास्पर्धेत सहभागी झाले आहेत. यासोबतच निवड चाचणी स्पर्धा येथे होत आहे. या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठीच्या महाराष्ट्र संघाची निवड येथे होणार आहे. स्पर्धेत 288 खेळाडू खेरीज निवड चाचणीत 120 खेळाडू सहभागी होण्यासाठी राज्यभरातून गडचिरोलीत दाखल झाले आहेत.

ध्वजारोहण आणि क्रिडा ज्योत प्रज्वलन झाल्यानंतर सहभागी संघानी संचलन केले. त्यानंतर स्पर्धेचे उद्घाटन झाल्याची घोषणा खासदार नेते यांनी केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजीत कुमार हे होते. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य प्रशांत वाघरे, नागपूर विभागाचे क्रिडा उपसंचालक सुभाष रेवतकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, सैनिक शाळेचे प्राचार्य संजय भांडारकर आणि जिल्हा क्रिडा अधिकारी चंद्रदीप शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा शुभारंभाचा सामना मुंबई आणि नाशिक संघादरम्यान खेळवला गेला. स्पर्धेत राज्य संघाची निवड होईल यासाठी राज्य व्हॉलीबॉल संघटनेचे 15 सदस्य आणि निवड समितीचे 9 सदस्यही आले आहेत. स्थानिक स्तरावर गडचिरोली जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे सतिश पवार तसेच इतर सदस्य मदत करीत आहेत.

गडचिरोली सारख्या जिल्हयात किती चांगल्या प्रकारचे नियोजन करुन राज्यस्तर स्पर्धा घेतल्या जाऊ शकतात हे या स्पर्धेच्या रुपाने सर्वांना बघायला मिळाले आहे. राज्य शासन खेळाडूंच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे असून अगदी तालूक्यापर्यंत क्रिडा सुविधा आम्ही उपलब्ध करुन देणार आहेात असे खासदार अशोक नेते यांनी सांगितले.

गडचिरोली जिल्हयात राज्यासाठीचे आदिवासी खेळाडूंसाठीचे सर्वात मोठे क्रीडा सुविधा असणारे संकूल उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येत आहे. गडचिरोली किंवा अहेरी यापैकी एका ठिकाणी ही सुविधा असेल. असे कार्यक्रमाचे अध्यक्ष गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनी सांगितले.

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा गडचिरोलीत शानदार शुभारंभ


गडचिरोली, दि.1-राज्याच्या आठ विभागातून आलेल्या विद्यार्थ्यांचे लयबध्द संचलन आणि विविध रंगानी सजलेली मैदाने अशा शानदार पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आणि निवडचाचणी स्पर्धेचे आज एका दिमाखदार सोहळयात गडचिरोली येथे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

गडचिरोली येथील गोंडवाना सैनिक शाळेच्या मैदानावर या स्पर्धा होत आहेत. राज्याच्या आठ विभागातील 14, 17 व 19 वर्ष वयोगटातील गट निहाय प्रत्येक आठ असे एकूण 24 संघ यास्पर्धेत सहभागी झाले आहेत. यासोबतच निवड चाचणी स्पर्धा येथे होत आहे. या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठीच्या महाराष्ट्र संघाची निवड येथे होणार आहे. स्पर्धेत 288 खेळाडू खेरीज निवड चाचणीत 120 खेळाडू सहभागी होण्यासाठी राज्यभरातून गडचिरोलीत दाखल झाले आहेत.

ध्वजारोहण आणि क्रिडा ज्योत प्रज्वलन झाल्यानंतर सहभागी संघानी संचलन केले. त्यानंतर स्पर्धेचे उद्घाटन झाल्याची घोषणा खासदार नेते यांनी केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजीत कुमार हे होते. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य प्रशांत वाघरे, नागपूर विभागाचे क्रिडा उपसंचालक सुभाष रेवतकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, सैनिक शाळेचे प्राचार्य संजय भांडारकर आणि जिल्हा क्रिडा अधिकारी चंद्रदीप शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा शुभारंभाचा सामना मुंबई आणि नाशिक संघादरम्यान खेळवला गेला. स्पर्धेत राज्य संघाची निवड होईल यासाठी राज्य व्हॉलीबॉल संघटनेचे 15 सदस्य आणि निवड समितीचे 9 सदस्यही आले आहेत. स्थानिक स्तरावर गडचिरोली जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे सतिश पवार तसेच इतर सदस्य मदत करीत आहेत.

गडचिरोली सारख्या जिल्हयात किती चांगल्या प्रकारचे नियोजन करुन राज्यस्तर स्पर्धा घेतल्या जाऊ शकतात हे या स्पर्धेच्या रुपाने सर्वांना बघायला मिळाले आहे. राज्य शासन खेळाडूंच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे असून अगदी तालूक्यापर्यंत क्रिडा सुविधा आम्ही उपलब्ध करुन देणार आहेात असे खासदार अशोक नेते यांनी सांगितले.

गडचिरोली जिल्हयात राज्यासाठीचे आदिवासी खेळाडूंसाठीचे सर्वात मोठे क्रीडा सुविधा असणारे संकूल उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येत आहे. गडचिरोली किंवा अहेरी यापैकी एका ठिकाणी ही सुविधा असेल. असे कार्यक्रमाचे अध्यक्ष गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनी सांगितले.

Saturday 24 October 2015

3 उपकमांडरसह 7 नक्षल वाद्यांचे आत्मसमर्पण



गडचिरोली दि.24- गडचिरोली पोलिस दलाच्या कार्यक्षमतेमुळे व शासनाच्या नक्षवाद्यांसाठीच्या आत्मसमर्पण योजनेमुळे जिल्हयाचे चित्र बदलत आहे. या अंतर्गत 3 कमांडरसह 30 लाखांचे बक्षीस असणारे 7 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना पोलिस अधिक्षक संदीप पाटील.

या सात जणांच्या आत्मसर्पणामुळे यावर्षी शरण आलेल्या नक्षलवाद्यांची संख्या 35 झाली आहे. यात उल्लेखनीय बाब म्हणजे केवळ 8 महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या पोटके पोलिस ठाणे क्षेत्रातील 15 जहाल नक्षवाद्यांचा समावेश आहे.

पोलिस विभागातर्फे राबविण्यात येणा-या विविध उपक्रम आणि पुनर्वसन योजना यामुळे प्रेरित होवून हे नक्षलवादी आत्मसमर्पणासाठी समोर आले आहेत. असे पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले.

दलम मधील उपकमांडर जानू उर्फ सोमा गोंगलू गोटा याच्यासह राजेश उर्फ कोटेश्वरराव बोरीया कनिती (तेलंगणा) , दलम उपकमांडर निर्मला उर्फ सरिता नरोटे, छत्तीसगडच्या कुत्तुल दलाचा सदस्य श्यामराव उर्फ टांगरु मिसा उसेंडी, रतन मुन्शी कोवासे , सुशीला उर्फ सुखमनी राजू मडावी तसेच रम्मी उर्फ महानंदा मानू पोटावी अशी या आत्मसमर्पित नक्षल वाद्यांची नावे आहेत.

गडचिरेाली जिल्हयात पोलिस दलाने विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली याचा जबर धक्का या नक्षलवादी चळवळीला बसला आहे. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कामगिरीमुळे लोकांचा विश्वास संपादन करणे त्यांना शक्य झाले त्याचा परिणाम या प्रकारच्या आत्मसमर्पणातून सकारात्मक पध्दतीने दिसत आहे.

नक्षलवाद विरोधी उपक्रमासोबतच समाज उपयोगी कार्यक्रम पोलिसदल सातत्याने घेत आहे. आत्मसमर्पण करण्यासाठी पुढे आलेल्या या नक्षलवाद्यांचे समाजाच्या मुख्यप्रवाहात सामिल होण्याच्या दृष्टीकोणातून पुनर्वसन करण्याकडेही विशेष लक्ष पुरविण्यात येत आहे. त्यामुळे नक्षलवादी चळवळीला उतरती कळा लागल्याचे चित्र आता दिसत आहे.

या पत्रकार परिषदेला गडचिरोलीचे अपर पोलिस अधीक्षक मंजुनाथ सिंगे तसेच जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांची उपस्थिती होती.

Monday 19 October 2015

पोलिसांकडून आतापर्यंत 164 नक्षलवाद्यांना कंठस्नान


Ø गत पाच वर्षात राज्यात 52 नक्षलवादी ठार

Ø वर्षभरात देशात 47 साथीदार गमाविल्याची नक्षलवाद्यांची कबुली

नागपूर, दि. 19 – नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात शासनाच्यावतीने राबविण्यात येणारी आत्मसमर्पण योजना चांगलीच यशस्वी होत आहे. त्याचीच फलश्रृती म्हणून गडचिरोलीत आतापर्यंत 483 नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहाची वाट धरली आहे. बंदुका खाली ठेवून आत्मसमर्पण कराल तर स्वागतच, मात्र गोळी चालवाल तर त्याच भाषेत प्रतिउत्तर, अशी रनणीती गडचिरोली पोलिसांनी अवलंबिली आहे. त्यामुळेच पोलिसांना आतापर्यंत तब्बल 164 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. नक्षलवाद्यांच्या गोळीला गोळीनेच उत्तर देणा-या महाराष्ट्र पोलिसांनी गत पाच वर्षांत 52 नक्षलवादी ठार केले आहेत. विशेष म्हणजे गत वर्षभरात देशातील विविध ठिकाणी पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत चळवळीतील 47 साथीदारांना जीव गमवावा लागला, अशी कबुली खुद्द नक्षलवाद्यांनी पत्रकातून दिली आहे.

राज्यातील सर्वाधिक नक्षल प्रभावित जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. अतिसंवेदनशील असलेल्या या जिल्ह्याला छत्तीसगड, आंध्रप्रदेश या राज्याची सीमा लागली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल असल्यामुळे येथे नक्षली कारवाया होतात. गत काही वर्षांपासून शासनाने नक्षल चळवळ मोडून काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. नक्षल चळवळीत भरकटलेल्या तरुण-तरुणींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबरोबरच जंगलात पोलिसांनी विशेष रणनिती, जंगल युध्दनिती आणि गणिमीकाव्याचा अवलंब केल्यामुळे नक्षलवाद्यांना सळो की पळो करून सोडले आहे.

गडचिरोली हा जिल्हा 1982 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा झाला. शेजारच्या आंध्रप्रदेशातून महाराष्ट्रात 1980 च्या दशकात नक्षलवादाचा प्रवेश झाला. जिल्ह्याची स्थापना होण्यापुर्वीच या भागात नक्षल चळवळ हळूहळू आपले पाय पसरत होती. याला प्रत्युत्तर देण्यासाठी शासनाने विशेष अभियान राबवून नक्षल चळवळ मोडून काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या भागात पोलिसांकडून सर्वात पहिला नक्षलवादी 2 नोव्हेंबर 1980 मध्ये मारला गेला. तत्कालीन चंद्रपूर जिल्ह्यातील मोयाबीनपेठा या ठिकाणी राज्य राखीव पोलिस दलासोबत झालेल्या चकमकीत शिरपूर दलम कमांडर पेद्दी शंकर हा पोलिसांच्या गोळीचा पहिला निशाणा ठरला.

त्यानंतर चार-पाच वर्षे पोलिसांना फारसे यश मिळाले नाही. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पोलिसांनी नक्षलवाद्यांविरूध्द आघाडी उघडली. 1986 मध्ये एक नक्षलवादी, तर दुस-या वर्षी 1987 मध्ये दोन नक्षलवाद्यांना पोलिसांनी यमसदनी पाठविले. नक्षलवादी गरीब आदिवासींचा ढाल म्हणून उपयोग करीत असल्यामुळे काहीवेळा पोलिसांसमोर अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे आदिवासी नागरीकांचे रक्षण करून नक्षलवाद्यांना टिपणे, पोलिसांसमोर एक आव्हान होते. या आव्हानाला स्विकारून पोलिसांनी नक्षल्यांविरूध्द आपली लढाई निरंतर सुरू ठेवली आहे.

दिवस-रात्र जंगल पिंजून काढत पोलिसांनी नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यास सुरूवात केली. सन 1986 ते 1990 या पाच वर्षांत पोलिसांनी 5 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. सन 1991 ते 1995 या पाच वर्षात तब्बल 38 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. सन 1996 ते 2000 या कालावधीत 7 नक्षलवादी, सन 2001 ते 2005 या काळात 17 नक्षलवादी ठार झाले. विशेष म्हणजे 12 ऑक्टोबर 2004 मध्ये नक्षल्यांनी देवसुर रोड येथे पोलिसांना मारण्यासाठी भुसुरूंग ठेवत असतांना त्याचा स्फोट झाल्याने एका नक्षलवाद्याचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. सन 2006 ते 2010 या काळात 44 नक्षलवादी तर गत पाच वर्षांत म्हणजे सन 2011 ते 30 सप्टेंबर 2015 या कालावधीत सर्वाधिक 52 नक्षलवाद्यांना पोलिसांनी यमसदनी पाठविले आहे. यात सन 2011 मध्ये 7 नक्षलवादी, सन 2012 मध्ये 4 नक्षलवादी, सन 2013 मध्ये सर्वाधिक 26 नक्षलवादी, सन 2014 मध्ये 13 आणि चालू वर्षी 30 सप्टेंबर 2015 पर्यंत ठार झालेल्यांमध्ये दोन नक्षलवाद्यांचा समावेश आहे. यावर्षी 6 सप्टेंबर 2015 रोजी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत प्लाटून क्र. 3 चा उपकमांडर प्रमोद उर्फ मैनु पोटावी (रा. पेंदूलवाही, ता. ऐटापल्ली) आणि कंपनी क्र. 10 चा सदस्य कुम्मे उर्फ रंजू उर्फ जिजा मज्जी (रा. मिडदापल्ली, ता. भामरागड) ठार झाले. तसेच पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत आतापर्यंत 50 च्यावर नक्षलवादी गंभीर जखमी झाले आहेत.

नक्षल चळवळीचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोलीत आता शासन आणि पोलिसांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम आणि विकासात्मक योजनांची पायाभरणी होत आहे. त्यातच पोलिस दलाची सतर्कता आणि सक्षमीकरण या माध्यमातून नक्षल चळवळीचा बिमोड करणे, भरकटलेल्या युवकांना आत्मसमर्पणाचा मार्ग दाखवून त्यांचे पूनर्वसन करणे व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणेदेखील सुरु आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून जिल्ह्याची प्रतिमा सुधारण्याच्या दृष्टीने सकारात्मक असा परिणाम दिसत आहे.
  
अ.क्र.
वर्ष
ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या
1
सन 1980 ते 1985
1
2
सन 1986 ते 1990
5
3
सन 1991 ते 1995
38
4
सन 1996 ते 2000
7
5
सन 2001 ते 2005
17
6
सन 2006 ते 2010
44
7
सन 2011 मध्ये
7
8
सन 2012 मध्ये
4
9
सन 2013 मध्ये
26
10
सन 2014 मध्ये
13
11
30 सप्टेंबर 2015 पर्यंत
2
                                                       0000000000000