Sunday, 1 November 2015

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा गडचिरोलीत शानदार शुभारंभ


गडचिरोली, दि.1-राज्याच्या आठ विभागातून आलेल्या विद्यार्थ्यांचे लयबध्द संचलन आणि विविध रंगानी सजलेली मैदाने अशा शानदार पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आणि निवडचाचणी स्पर्धेचे आज एका दिमाखदार सोहळयात गडचिरोली येथे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

गडचिरोली येथील गोंडवाना सैनिक शाळेच्या मैदानावर या स्पर्धा होत आहेत. राज्याच्या आठ विभागातील 14, 17 व 19 वर्ष वयोगटातील गट निहाय प्रत्येक आठ असे एकूण 24 संघ यास्पर्धेत सहभागी झाले आहेत. यासोबतच निवड चाचणी स्पर्धा येथे होत आहे. या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठीच्या महाराष्ट्र संघाची निवड येथे होणार आहे. स्पर्धेत 288 खेळाडू खेरीज निवड चाचणीत 120 खेळाडू सहभागी होण्यासाठी राज्यभरातून गडचिरोलीत दाखल झाले आहेत.

ध्वजारोहण आणि क्रिडा ज्योत प्रज्वलन झाल्यानंतर सहभागी संघानी संचलन केले. त्यानंतर स्पर्धेचे उद्घाटन झाल्याची घोषणा खासदार नेते यांनी केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजीत कुमार हे होते. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य प्रशांत वाघरे, नागपूर विभागाचे क्रिडा उपसंचालक सुभाष रेवतकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, सैनिक शाळेचे प्राचार्य संजय भांडारकर आणि जिल्हा क्रिडा अधिकारी चंद्रदीप शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा शुभारंभाचा सामना मुंबई आणि नाशिक संघादरम्यान खेळवला गेला. स्पर्धेत राज्य संघाची निवड होईल यासाठी राज्य व्हॉलीबॉल संघटनेचे 15 सदस्य आणि निवड समितीचे 9 सदस्यही आले आहेत. स्थानिक स्तरावर गडचिरोली जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे सतिश पवार तसेच इतर सदस्य मदत करीत आहेत.

गडचिरोली सारख्या जिल्हयात किती चांगल्या प्रकारचे नियोजन करुन राज्यस्तर स्पर्धा घेतल्या जाऊ शकतात हे या स्पर्धेच्या रुपाने सर्वांना बघायला मिळाले आहे. राज्य शासन खेळाडूंच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे असून अगदी तालूक्यापर्यंत क्रिडा सुविधा आम्ही उपलब्ध करुन देणार आहेात असे खासदार अशोक नेते यांनी सांगितले.

गडचिरोली जिल्हयात राज्यासाठीचे आदिवासी खेळाडूंसाठीचे सर्वात मोठे क्रीडा सुविधा असणारे संकूल उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येत आहे. गडचिरोली किंवा अहेरी यापैकी एका ठिकाणी ही सुविधा असेल. असे कार्यक्रमाचे अध्यक्ष गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजीत कुमार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment