Tuesday, 17 November 2015

गडचिरोलीच्या विकासाची बांधिलकी !

राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि श्रीलक्ष्मी मीत्तल यांच्या भेटीच्या प्रसंगीचे छायाचित्र
गडचिरोली सारख्या अतिदुर्गम भागाचा विकास हे खूप मोठं आवाहनात्मक काम आहे. यात उद्योग व्यवसाय आणि दळण-वळणाची साधने वाढवून जलदगतीने विकास साधणं शक्य आहे. याचा पूर्ण अभ्यास करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रत्येक कृतीतून या भागाच्या विकासाप्रती असणारी आपली बांधिलकी वेळोवेळी स्पष्ट केली आहे. सध्या इंग्लंड दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात याचीच प्रचिती आलेली आहे.
विस्ताराने राज्यात सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा हा जिल्हा वनसंपत्ती आणि खनिजांनी समृध्द असा जिल्हा आहे. वर्षभरापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी प्राधान्यक्रमाने जिल्हयाचा दौरा करुन या जिल्ह्याच्या विकासाची निकड असल्याची जाणीव सर्वांनाच करुन दिली होती.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याच्या आदिवासी विकासाचे राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांच्याही कडून या जिल्हयाच्या विकासाला गती मिळाल्याचे चित्र गेल्या वर्षभराच्या कालावधीत दिसत आहे.

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करुन जिल्हयात रस्त्यांचे जाळे कसे विस्तारीत करता येईल याबाबत बैठका घेऊन या संदर्भातील आराखडा त्यांनी अंतिम करवून घेतला. या माध्यमातून हा जिल्हा देशाच्या इतर भागांशी चारपदरी राष्ट्रीय महामार्गांनी बनण्याचा मार्ग आता खूला झाला. यामध्ये साकोली-वडसा-गडचिरोली-आलापल्ली ते सिरोंचा हा मार्ग महत्वाचा आहे. साधारण 250 किमी लांबीचा हा महामार्ग जिल्हयाला पूर्णपणे बदलून टाकणारा ठरेल हे आता स्पष्ट झाले आहे. जिल्हा मुख्य राष्ट्रीय महामार्गाच्या नकाशावर आल्याने याठिकाणी येणाऱ्या काळात मोठया प्रमाणावर बदल दिसतील व जिल्हा झपाटयाने विकसित होईल यात शंकाच नाही.

याच पध्दतीचा पाठपुरावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी देसाईगंज (वडसा) - गडचिरोली रेल्वे मार्गाबाबत केल्याने या रेल्वे मार्गाच्या कामालाही गती मिळाली. केंद्र आणि राज्य यांच्या 50:50 टक्के भागीदारीतून निर्माण होणाऱ्या या मार्गासाठी राज्याचा वाटा केवळ मंजूर केला असं नाही तर त्याची तरतूदही या वर्षीच्या अर्थसंकल्पात झाली हे उल्लेखनीय.

दिवाळीच्या पूर्वसंध्येस या मार्गाबाबत निविदापूर्व चर्चा देखील झाली. या मार्गाचे काम येत्या 3 वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे. असे झाल्यास गडचिरोली देशातील सर्वच भागांना जोडले जाईल आणि या जिल्हयातील प्रत्येकाचे गडचिरोली-मुंबई थेट रेल्वेचे स्वप्न प्रत्यक्षात येईल. याची मुहूर्तमेढ आता रोवली गेली आहे. राज्यात वर्षपूर्ती केलेल्या शासनाने गडचिरोली वासीयांना दिलेली ही सर्वात मोलाची भेट ठरली आहे.

विदेश दौऱ्यात उद्योजकांच्या भेटी घेऊन त्यांना महाराष्ट्रात उद्योग उभारणी करण्यासाठी प्रेरित करणे हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे खास वैशिष्ट्य आहे. या कामातही त्यांची गडचिरोली जिल्हयाच्या विकासाची बांधिलकी दिसली. जग ज्यांना स्टील उद्योगाचे "किंग" म्हणून ओळखते अशा लक्ष्मी मित्तल यांना गडचिरोलीत उद्योग सुरु करण्याबाबत आग्रहीपणाने सूचविले.

 गडचिरोली जिल्हयात वनसंपत्ती सोबत लोहखनिज मुबलक प्रमाणात आहे. जिल्हयातील सूरजागड भागात याची उपलब्धता अधिक आहे. त्यामूळे या भागात स्टील उद्योगाची उभारणी सहजशक्य आहे. त्याच्या जोडीला रस्ते आणि रेल्वेचे जाळेदेखील उभे राहत आहे. त्यामुळे उद्योग उभारणी अधिक सुकर होणार आहे.
 
दिनांक: 17 नोव्हेंबर 2015
प्रशांत अनंतराव दैठणकर
जिल्हा माहिती अधिकारी
गडचिरोली
9823199466

No comments:

Post a Comment