Friday, 2 October 2015

विद्यापीठे ही नाविण्य व संशोधन केंद्रे व्हावी ना- सुधीर मुनगंटीवार

गोंडवाना विद्यापीठाचा चौथा स्थापना दिन उत्साहात

गडचिरोली, दि.2: विद्यापीठे ही केवळ शिक्षणाची केंद्र न राहता ती नाविण्य आणि संशोधनाची ठिकाणे बनली पाहिजेत असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या चौथ्या स्थापनादिन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगूरु डॉ. एन. व्ही. कल्याणकर हे होते. कार्यक्रमात जिल्हयाचे खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे, माजी कुलगुरु डॉ. कीर्तीवर्धन दिक्षीत तसेच कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यापीठाच्या स्थापनेसाठी चंद्रपूर की गडचिरोली असा विचार असतांना मनातील व्दंव्द बाजूला सारुन आपण गडचिरोलीला प्राधान्य दिले. असे सांगतांना मुनगंटीवार यांनी विधानसभेत विद्यापीठ स्थापनेचा कसा पाठपुरावा आपण केला याची आठवण या प्रसंगी सांगितली.
विद्यापीठाला वाढीव जागा लागणार आहे त्यासाठी लगतच्या एमआयडीसी सह खाजगी जागांच्या मालकांशी चर्चा करुन ती जमीन खरेदी करण्याची शासनाची तयारी आहे. प्रसंगी बाजार भावाने जागा खरेदी करुन ती आपण विद्यापिठाला उपलब्ध करुन देवू अशी ग्वाही याप्रसंगी त्यांनी यावेळी दिली. 2003 साली या विद्यापिठाच्या स्थापनेसाठी तत्कालिन मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्याशी झालेली आरंभिक चर्चा आणि विद्यापिठ स्थापनेत गडचिरोलीचे माजी पालकमंत्री दिवंगत आर.आर.पाटील आणि शिक्षण व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी सहकार्याची आणि सकारात्मक भूमिका ठेवली होती. याचीही आठवण त्यांनी या भाषणात केली.
येणा-या काळात विद्यापिठात चालणा-या अभ्यासक्रमात थेट कार्पोरेट जगतामधील गुंतवणूक व्हावी यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. यासाठी भारतामधील आघाडीच्या 100 उद्योगांच्या प्रमुखांची एक बैठक लवकरच महामहिम राज्यपालांनी घेण्याचे आयोजन करण्यात आले आहे. याव्दारे विद्यापिठातील विद्यार्थ्यांवर थेट गुंतवणूक येणा-या काळात होईल असेही ते म्हणाले.

विदर्भ विकासाचा अनुशेष भरुन निघावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह आपण कटिबध्द आहोत याचाच एक भाग म्हणून गडचिरेाली -मूल -चंद्रपूर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून विकसित करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. सोबतच येणा-या काळात सिरोंचा ते भामरागड हा मार्ग देखील राष्ट्रीय महामार्ग करण्यात येईल. अशी घोषणा त्यांनी याप्रसंगी केली.

विद्यापीठाला सभागृह गोंडवाना विद्यापीठाच्या परिसरात 800 आसन क्षमतेचे वातानुकूलीत सभागृह येत्या 2 वर्षात व्हावे यासाठी साडेपाच कोटी रुपयाचा प्रस्ताव विद्यापीठाने द्यावा आपण तो निधी देऊ अशी घोषणा अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी केली. यासोबत गडचिरोली शहरामध्ये एक सुसज्ज असे नाटयगृह बनविण्यात येईल असेही त्यांनी यावेळी जाहिर केले.
विद्यापीठाच्या शैक्षणिक दर्जामध्ये कोणतिही तडजोड करण्यात येऊ नये असे सांगुन हे विद्यापीठ आगामी काळात नामांकीत संशोधक तयार करेल. अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. जगभरात ख्यातनाम 200 शैक्षणिक संस्थांमध्ये भारतामधील एकही संस्था नाही. याबाबतचा अहवाल राज्यपालांच्या एका बैठकीत सादर करण्यात आला याची खंत व्यक्त करुन ते म्हणाले की, इमारत आणि सुविधांनी विद्यापीठ होत नाही तर ते संशोधनाने तयार होते. अशा प्रकारचे संशोधन या विद्यापीठात करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सुचना त्यांनी या प्रसंगी केल्या.
विद्यापीठामध्ये जे अभ्यासक्रम सुरु आहेत त्याच्याच जोडीला तांत्रिक अभ्यासक्रम विद्यापीठ स्तरावर सुरु करण्यात येतील असे कुलगुरु डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. विद्यापीठात शिक्षण घेतांना याच भागात रोजगार प्राप्त होईल अशा अभ्यासक्रमांना येणाऱ्या काळात प्राधान्य दिले जाईल असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणारे पालकमंत्री अंब्रीशराव आत्राम या कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाहीत याप्रसंगी त्यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे आदींची यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. ईश्वर मोहुर्ले यांनी केले तर डॉ. एस. एम. रोकडे यांनी आभार प्रदर्शन केले.

No comments:

Post a Comment