Saturday 29 August 2015

गडचिरोली जिल्हा माहिती कार्यालय आता डिजिटल स्वरुपात

गडचिरोली : संगणकाच्या एका क्लिकवर गडचिरोली जिल्ह्याची माहिती उपलब्ध करुन देणाऱ्या ब्लॉगच्या माध्यमातून जिल्हा माहिती कार्यालय गडचिरोलीतर्फे "डिजिटल ऑफिस" संकल्पना सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या या ब्लॉगचे उद्घाटन नागपूर-अमरावती विभागाचे संचालक मोहन राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. 

नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी ब्लॉगची माहिती देणारे सादरीकरण केले. माहिती तंत्रज्ञान युगाला अनुसरुन या कार्यालयातर्फे व्हॉटस्ॲप आणि फेसबूकच्या माध्यमातून या आधीपासूनच माहिती पुरविण्यात येत आहे. याचा पुढचा टप्पा या ब्लॉगच्या रुपाने उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 

http://informationgadchiroli.blogspot.com या लिंकच्या आधारे आपणास ब्लॉगवरील माहिती बघणे शक्य होणार आहे. याच ब्लॉगवर महाराष्ट्र शासन तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि गडचिरोली जिल्हा प्रशासन आदींच्या अधिकृत संकेतस्थळांचे दुवे (लिंक) उपलब्ध आहे. या व्यतीरिक्त महासंचालनालयाचे न्यूज पोर्टल असणाऱ्या महान्यूजसाठीही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

ब्लॉगच्या उद्घाटनप्रसंगी चंद्रपूरचे जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, वर्धाचे अनिल गडेकर, भंडाराचे मनिषा सावळे, गोंदियाचे विवेक खडसे, नागपूरचे अनिल ठाकरे, बुलढाणा व अमरावतीचे सुरेश काचावार, वाशिम व अकोलाचे युवराज पाटील, यवतमाळचे मंगेश वरकड आदी उपस्थित होते. सर्वांनी या ब्लॉगला भेट देऊन याबाबतचे अभिप्राय ब्लॉगवर नोंदवावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी केले आहे. 

1 comment: