Monday 13 June 2016

जीवनशैलीतच असावी जलजागृती

13 जून 2016

आपण सारे ज्याची आतूरतेने वाट बघतो असा ऋतू म्हणजे पावसाळा होय. मौसमी हवामानाच्या क्षेत्रात आपला देश आहे. आजही देशातला प्रमुख व्यवसाय शेती आणि शेती आधारित उद्योग असा आहे. आसेतूहिमाचल अशा आपल्या या खंडप्राय देशात भौगोलिक रचनेमुळे सर्वत्र सिंचन सुविधा नाही त्यामुळे पडणारा पाऊस सर्वांसाठी महत्वाचा असतो.

महाराष्ट्रात अनेक भागात चांगला पाऊस होत असला तरी मराठवाडा आणि लगतच्या पश्चिम महराष्ट्राचा भाग हा पर्जन्य छायेच्या क्षेत्रात येतो यामुळे येथे पडणा-या पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यात गेल्या ३-४ वर्षात सातत्याने घट दिसून आली आहे. नागरिकरणाचा वाढता जोर आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता सर्वाधिक प्राधान्य पेयजलासाठी देण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही अशा स्थितीत निर्माण झालेल्या सिंचन सुविधांचा वापर देखील पेयजलासाठी करण्याची वेळ आली आहे.भूजलाचा मोठया प्रमाणावर होत असलेला उपसा आणि कमी होत गेलेला पाऊस यामुळे पहिली धोक्याची घंटा लातूरमध्ये वाजली. पिण्यास पाणीच नाही अशा परिस्थितीमुळे येथे रेल्वेव्दारे पाणी आणून पाणीपुरवठा करावा लागला. परिस्थितीने निर्माण केलेल्या या आव्हानाचा मुकाबला शासनाने अतिशय चांगल्या पध्दतीने केला आणि लातूरकरांना पाणी उपलब्ध झाले.असाच काहीसा प्रकार काही वर्षापूर्वी मध्य प्रदेश राज्यातील देवास मध्ये घडला मात्र लोकांनी आपली जबाबादारी मानत पाणी कमावण्याचा निर्धार केला आणि तेथील चित्र अमुलाग्र बदलले. हीच प्रतिक्रिया आपल्या राज्यातही अपेक्षित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारणा-या जलयुक्त शिवार उपक्रमासोबतच मागेल त्याला शेततळे सारख्या उपक्रमांना प्रतिसाद मिळत आहे ही निश्चितपणे चांगली बाब आहे. या निमित्ताने जलजागृती राज्यात सुरू झाली आहे.आलेला बदल निश्चितच चांगला आहे मात्र त्याही पलिकडे जाऊन येणा-या काळात काम अपेक्षित आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पाऊस पडून सारं आबादानी होईल असं आशादायी चित्र सध्या सर्वत्र आहे. अशा स्थितीत पुन्हा पाण्याचा अमर्याद वापर सुरू होण्याचा धोका आहे. तो टाळणे ही आजची काळाची गरज आहे.आपण वर्षानुवर्षे जमिनीतून पाण्याचा उपसा करून शेती पिकवली आता त्या धरतीचं ते दान परत देण्याची वेळ आली आहे. पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब कसा जिरवता येईल यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने विचार आणि कृती करण्याची गरज आहे.जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत तयार झालेल्या शेततळयांनी काही प्रमाणात सुक्ष्म सिंचन क्षमता प्रत्येक शेतक-याला निर्माण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शहरांमधून राहणा-या जनतेनेही यात आपला वाटा उचलण्याची गरज आहे. पावसाचं करोडो लिटर पायी वाहून जाताना आपण शहरात बघतो. हा प्रकार आपण कसा रोखता येईल याचा विचार व्हायला पाहिजे.निसर्ग आपणास जे मुक्तहस्ते देत आहे त्याचा वापर आपण योग्य पध्दतीने केला तर येणा-या काळात आपलंच जगणं सुकर होणार आहे. येणा-या पिढीला आपण निसर्गासोबत कसं जगता येईल याचा वस्तूपार घालून देण्याची गरज आहे.'रेन वॉटर हार्वेस्टींग' च्या रूपाने निसर्गाचं हे पावसाचं दान धरतीला परत करणा-या इमारती बांधल्या जात आहे मात्र लोकसंख्या आणि भौगोलिक क्षेत्र यांच्या तुलनेत अशा इमारतींचे प्रमाण नगण्य म्हणावे लागेल. छतावर सोलार उपकरणांची मांडणी करून आपण शहरी भागात वीज कमावू शकतो. याच छतावर पडणारं पावसाचं पाणी बेसमेंटमध्ये साठवून वापरण्यासोबतच उर्वरित पाणी आपण बोअरच्या माध्यमातून थेट जमिनीत फेरभरणासाठी देऊ शकतो. धुणी-भांडी करताना वाया जाणारं पाणी शोषखड्डयाच्या माध्यमातून आपण जमिनीत जाईल अशी व्यवस्था करू शकतो त्यामुळे भूजल साठयात वाढच होणार आहे.निसर्गाच्या जवळ असणे यासाठीच आवश्यक ठरते. यापूर्वीच्या काळात मोटर द्वारे शेतीला पाणी देण्याची पध्दत होती आता वीज आली आणि वीज नसेल तरी डिझेल पंपाच्या माध्यमातून आपण उपसा करतो. यात पाणी अमर्यादपणे उपसले जात आहे. हेच पाणी आपण जुन्या पध्दतीप्रमाणे किंवा नव्या तंत्राने अर्थात ठिबक सिंचनाच्या रुपात शेतीला दिले तर उपशाचे हे प्रमाण ६० ते ७० टक्के इतके कमी होवू शकते.पाण्याचा योग्य विनियोग आपण करायचं ठरवलं तर खरीप आणि रब्बी सोबत उन्हाळी हंगामात देखील आपण पिक घेऊ शकतो. आता आलेली ही जलजागृती हा आपण जीवनशैलीचा भाग बनवल्यास येणा-या काळात जलसंकट येणार नाही आणि शेतकरी देखील संपन्न होईल ही खात्री आहे.


-प्रशांत अनंतराव दैठणकर९८२३१-९९४६६


No comments:

Post a Comment