Wednesday, 23 December 2015

डॉ. प्रकाश आमटेंशी संवाद....!

बुधवार, २३ डिसेंबर, २०१५‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ हे नाव आता सगळ्या जगालाच माहिती झालं आहे. त्यांच्या कार्याबाबत सर्वांना उत्सुकता आणि कुतूहल असल्याने महाराष्ट्राच्या टोकावर असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथील त्यांच्या घरी निवांत क्षणी त्यांच्याशी महान्युजने संवाद साधला.

प्रश्न :- आजपर्यंतच्या या प्रवासात आपण हा भाग वेगवेगळ्या टप्प्यात बघितला आहे. हा प्रवास नेमका कसा झाला?
उत्तर :- 42 वर्षांपूर्वी या ठिकाणी आम्ही आलो त्यावेळी इथं सारं जंगल होतं. प्रवासही सोपा नव्हता. मुळात त्यावेळी आलापल्लीच्या पुढे भामरागडपर्यंत रस्ताच नव्हता. मोठ्या बारमाही नद्या आणि या ठिकाणी पोहचण्यात खूप अडचणी होत्या. या ठिकाणी आल्यावर आमच्या पैकी कुणालाही स्थानिक भाषा बोलता येत नव्हती. या भागात शिक्षणाचा अभाव असल्याने मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा होती. घनदाट जंगलं आणि पाणि यामुळे पोटासाठी खायला काही नसलेली मंडळी येथे होती.

डॉ. प्रकाश आमटे यांच्याशी संवाद चालु असतांना माझ्या डोळ्यासमोर सत्तरच्या दशकातला काळ उभा राहिला. त्यावेळी गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झालेली नव्हती. त्यावेळी हा चांदा अर्थात चंद्रपुर जिल्ह्याचाच भाग होता. आताच्या रचनेत गडचिरोली हे नागपूरपासून 180 किलोमीटर अंतरावर आहे. आणि हेमलकसा गडचिरोलीपासून 180 किलोमीटर अंतरावर आहे. आलापल्ली मार्गे जावे लागते. आलापल्ली अणि गडचिरोली अंतर 120 किलोमीटर आहे. त्याकाळी पुढील साठ किलोमीटर अंतरासाठी रस्ता नव्हता आणि आजही सायंकाळी सहा नंतर जाण्यास किंवा येण्यास बस नाही. तसेच विस्तीर्ण नदीपात्र आणि येणारा पुर यामुळे संपुर्ण पावसाळ्यात भामरागड-हेमलकसाचा जगाशी संपर्क आजही तुटून जातो.

प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी पुढे सारा प्रवास उलगडला, परंतु त्यापूर्वी एक रुग्ण तेथे घेऊन दवाखान्यातून एक्स-रे सह एक सहाय्यक आला. डॉक्टरांचा मुलगाही तेथेच होता. त्या आदिवासी तरुणाचा खांदा निखळला होता. त्याच्या एक्सरे वरुन अंदाज घेऊन त्यांनी त्याला माडिया भाषेत समजावले आणि खाली झोपवले. केवळ दोनच मिनीटांत आपल्या पायाने खांदा आणि छाती जवळ दाब देत हाताला एक जोरदार झटका दिला आणि त्याचा खांदा जोडला गेला. त्याला काळजी घेण्यास सांगून पुढचा संवाद सुरु झाला.

प्रश्न :- या भागात माडिया आणि गोंड आदिवासी राहतात. गोंडी भाषेला किमान लिपी तरी आहे. माडिया भाषेला लिपीच नाही. अशा स्थितीत आदिवासी लोकांशी आपण संवाद कसा साधला?
उत्तर :- आरंभी ते अवघड आहे आणि होतं, मात्र संवाद करतांना प्रथम खाणा-खुणा आणि त्यातून मराठीत अमूक शब्द आहे त्याची खूण दाखवून माडियात काय म्हणतात त्याचे उच्चारण शिकणे असा प्रवास करीत अदिवासींशी संपर्क झाला. आसपासच्या गावात आजारी पडल्यावर प्रथम पुजाऱ्याकडे न्यायची पद्धत होती आता ती पुर्ण संपली असं नाही पण उपचारासाठी कुणीच येत नाही अशा स्थितीत बराच काळ गेला. एका पुजाऱ्यासोबत चांगलाच वाद झाला. पण पहिला रुग्ण आला त्यानंतर काही प्रमाणात आदिवासींमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण झालं आणि हळू हळू इथलं काम वाढत गेलं. माणसंही स्वत:हून पुढं आली. या भागात वैद्यकीय उपचार आता चांगल्या पद्धतीने देता येतील असं रुग्णालय आणि परिसरात राहण्याची व्यवस्था.. असं करत हेमलकसा वाढत गेलं.

वाचकांना सांगता येईल की येथे तीन किलोमीटरवर भामरागड आहे. त्याठिकाणी पामुलगौतम, पर्लकोटा आणि इंद्रावती नद्यांचा संगम आहे. विस्तीर्ण अशा संगमाच्या दुसऱ्या बाजुला डोंगर रांगा आहेत. तेथून छत्तीसगढ राज्य सुरु होते. नदी पार करायला डोंग्यातूनच प्रवास करावा लागतो. छत्तीसगढ मधील आदिवासी रुग्ण देखील येथे येत असतात.

प्रश्न :- या भागात आतापर्यंतच्या कामातला नेमकेपणाने अनुभव काय?
उत्तर :- या भागात आता लोक इथपर्यंत उपचाराला येतात परंतु वीज नसल्याने अर्धा अधिक काळ समस्या निर्माण होत असते. आता आजारी पडल्यावर गावच्या पुजाऱ्याकडे न जाता दवाखान्यात उपचार करावे हा विचार आदिवासींना पटलाय. आदिवासी मुलांना शिक्षणासाठी इथं सोय करु शकलो यामुळे आता त्यातही वाढ होत आहे. दलदल व जंगल अधिक असल्याने डासांचा उपद्रव ही इथली सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे पावसाळ्यात साथीचे रोग पसरतच असतात.

पुढे संवाद सुरु राहिला. नंतर मग त्यांच्या सोबत पहिल्या पासुन काम करणारे नांदेडचे जनार्दन मचकन यांच्या सोबत लोकबिरादरीचा तो विस्तीर्ण परिसर आणि त्यात असणारे प्रकल्प बघितले. जिथे आजही विषारी साप ‘कॉमन’ गोष्ट आहे. नद्यांमध्ये मगरी आहेत. अशा या हेमलकसात 42 वर्षात काय काय बदल घडले. हे जनार्दनराव सांगत सोबत फिरले.

जिल्ह्यात रुजू झाल्यावर असा निवांत भेटीचा उपक्रम करायचाच असा विचार केलेला. तो योग आज आला. आता पुन्हा कोणत्यातरी निमित्तानं भेटूच, असा निरोप घेत आम्ही त्रिवेणी संगमावरच्या प्रेक्षणीय सूर्यास्ताकडे धाव घेतली.


- प्रशांत अनंतराव दैठणकर
9823199466

'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.No comments:

Post a Comment