History



चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाने निर्मित जिल्हा

गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती २६ आगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून झाली. संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता व मुख्यतः गडचिरोली, सिरोंचा ही ठिकाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तहसील म्हणून कार्यरत होती. गडचिरोली जिल्ह्याचे एकुण क्षेत्रफळ १४४१२ चौ.कि.मी.आहे.

चंद्रपूर व ब्रम्हपुरी मधील जमिनदारी व मालमत्तेचे हस्तांतरण करून गडचिरोली तहसील म्हणून १९०५ पासून अस्तित्वात होती. ब्रम्हपुरी ऐवजी गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ या प्रदेशात मोडतो. फार प्राचीन काळी ह्या प्रदेशावर राष्ट्र्कुट यांचे राज्य होते. त्यानंतर चालुक्य, देवगीरीचे यादव यांचे साम्राज्य होते. यानंतर गडचिरोलीच्या गोंड राजांनी राज्य केले.

तेराव्या शतकात, खन्डक्या बल्लाळ शाह यांनी चंद्रपूरची स्थापना केली. त्यांनी आपली राजधानी सिरपूर येथून चंद्रपूर येथे हलविली. याचकाळात चंद्रपूर प्रदेश हा मराठ्याच्या सत्तेखाली आला. १८५३ मध्ये, बेरार हा चंद्रपूर (पूर्वीचे चांदा ) प्रदेशाचा भाग ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी च्या ताब्यात आला. १८५४ मध्ये चंद्रपूर हा बेरार या प्रदेशाचा स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. ब्रिटीशांनी १९०५ मध्ये चंद्रपूर व ब्राम्ह्पुरीची जमिनदारी व मालमत्ता हस्तांतरण करून गडचिरोली तहसीलची निर्मिती केली.

राज्याची पुनर्ररचना होण्यापुर्वी हा भाग १९५६ पर्यंत केंद्रीय अधिपत्याखाली होता. त्यानंतर राज्यपुनर्रचनेनुसार चंद्रपूर बॉम्बे स्टेट मध्ये समाविष्ट करण्यात आले. १९६० मध्ये केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्याची स्थापना करून त्यामध्ये चंद्रपूर हे जिल्हा म्हणून समाविष्ट करण्यात आले. १९८२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून ब्रम्हपुरी ऐवजी स्वतंत्र गडचिरोली जिल्हा अस्तित्वात आला. गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर-पूर्व दिशेला वसलेला असून आंध्रप्रदेश व छत्तीसगड राज्याच्या सीमा लागून आहेत. गडचिरोली जिल्हा हा पूर्णपणे नक्षल प्रभावित जिल्हा म्हणून ओळखला जातो. गडचिरोली जिल्हा जवळपास ७६ % जंगलाने व्यापलेला असल्याने घनदाट जंगलात नक्षल लोक आश्रय घेतात.




गडचिरोली जिल्हा हा मुख्यत्वे महाराष्ट्र राज्यात आदिवासी, मागासलेला व घनदाट जंगलाने व्याप्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. हा जिल्हा अतिदुर्गम, डोंगर द-याने व्याप्त व अविकसित असून जास्तीत जास्त क्षेत्र जंगलाने वेढलेला आहे. जिल्ह्याच्या एकूण जमिनीच्या क्षेत्रापैकी ७५.९६ टक्के भाग जंगलाने व्याप्त आहे. हा जिल्हा बांबुचे झाड व तेंदू ची पाने करीता प्रसिध्द आहे. भात हे जिल्ह्याचे मुख्य पिक आहे. याव्यतिरिक्त तूर, गहू, ज्वारी, सोयाबीन, जवस इत्यादी कृषी उत्पादने घेतली जातात. जिल्ह्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यामध्ये आष्टी येथे पेपर मिल असून इतर कोणतेही मोठे उद्योगधंदे नाहीत. यामुळे, जिल्हा हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. जिल्ह्यात भाताचे उत्पादन जास्त होत असल्याने भात गिरणी ची संख्या जास्त आहे. जिल्ह्यात कोसाचे उत्पादन होत असून कोसा उत्पादन केंद्र आरमोरी येथे आहे. जिल्ह्यात फक्त १८.५ कि.मी. लांबीचा रेल्वे मार्ग असून देसाईगंज येथे रेल्वेची सुविधा आहे.

गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुख्यतः गोंडी, माडिया, मराठी, हिंदी, तेलगु, बंगाली, छत्तीसगडी इत्यादी भाषा बोलल्या जातात.

गडचिरोली जिल्ह्यामध्ये शासनाने प्रशासकीयदृष्ट्या एकूण सहा उपविभाग (गडचिरोली, वडसा, अहेरी, चामोर्शी, एटापल्ली, कुरखेडा) निर्माण केले असुन प्रत्येक उपविभागात दोन तालुके सामाविष्ट करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात एकूण १२ तालुके आहेत. जिल्ह्यात ४६७ ग्रामपंचायती असून १६८८ राजस्व गावे अस्तित्वात आहेत. जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा व एक लोकसभा क्षेत्र (चंद्रपूर जिल्ह्याचा काही भाग मिळून) असून १२ पंचायत समीती आहेत. जिल्ह्यात गडचिरोली व देसाईगंज ही दोन शहरे असून येथे नगरपालिका आहेत.

गोदावरी नदी पश्चिमेकडून पूर्वे कडे वाहत असून तिचे पात्र जिल्ह्याच्या सीमेला लागून असून दक्षिण भागाला जिल्हा वसलेला आहे. गोदावरी नदीच्या उपनद्या जसे प्राणहिता (वैनगंगा व वर्धा या उपनद्या मिळून) व इंद्रावती ह्या मुख्य नद्या जिल्ह्याच्या सीमाभागात वाहतात.

जिल्ह्याचे पूर्वेत्तर भागात, धानोरा, एटापल्ली, अहेरी व सिरोंचा तालुके असून घनदाट जंगलाने व्याप्त आहे. जिल्ह्याच्या भामरागड, टिपागड, पलसगड व सुरजागड भागात उंच टेकड्या आहेत.

No comments:

Post a Comment