Tuesday, 26 January 2016

गडचिरोली जिल्हा विकासात अग्रेसर राहील - राजे अंब्रीशराव आत्राम


गडचिरोली,26:- गडचिरोली जिल्हयात येणाऱ्या काळात मोठया प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील. यासाठी प्रयत्न करण्यासोबतच जिल्हा विकासात अग्रेसर राहील यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासन प्रयत्नशील राहील व जिल्हा सर्वात पुढे राहील असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री व गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांनी आज प्रजासत्ताक दिनी केले.

येथील पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानांवर मुख्य शासकीय सोहळा झाला. पालकमंत्री राजे अंब्रीशराव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यानंतर पोलिस दल तसेच गृहरक्षक दल यांची सलामी त्यांनी स्विकारली.

या मुख्य शासकीय सोहळयास जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी रणजीत कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता आदींची प्रमुख उपस्थिती होती.

विकासाची प्रक्रिया ही सातत्यपूर्ण अशी प्रक्रिया आहे. सबका साथ सबका विकास हे शासनाचे धोरण राहिलेले आहे. यातही युवकांना प्राधान्य असणार आहे. यासाठीच अहेरी येथे मोठा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यात 300 कंपन्या येथे येत आहेत आणि याचठिकाणी मुलाखत देऊन नेमणूक पत्र देण्यात येईल. यात अधिकाधिक जणांनी सहभाग नोंदवावा असे पालकमंत्री आपल्या भाषणात म्हणाले.

आमचा शेतकरी बांधव सुखी झाला पाहिजे असं शासनाचे धोरण आहे. याचसाठी आपल्या गडचिरोली जिल्हयात विविध बँकांच्या माध्यमातून खरीप पिक कर्ज वाटप १०८ कोटी ७९ लक्ष रुपये करण्यात आले आहे असे पालकमंत्री यावेळी बोलताना म्हणाले.

आपल्या जिल्हयात धान हे प्रमुख पीक आहे. शासनातर्फे आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून सहा लाख क्किंटलहून अधिक धान खरेदी करण्यात आले त्याला २५० रुपये प्रति क्विंटल बोनस देखील जाहीर करण्यात आला होता.

आदिवासी विकास विभागाकडून शासकिय/ अनुदानित आश्रम शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, एकलव्य निवासी शाळा, व शासकीय मुला/ मुलींचे वसतीगृह येथील विद्यार्थ्यांच्या विविध अडचणीचे त्वरीत निराकरण करण्याचे उद्देशाने दिनांक १५ जानेवारी २०१६ रोजी पासुन १८००-२६७-०००७ हा टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना त्यांची काही तक्रार नोंदवावयाची असल्यास वर दर्शविलेल्या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यावर रितसर याची तक्रार संगणकामध्ये नोंदविल्या जाऊन संबंधित विभागाकडे ती तक्रार वर्ग केल्या जाईल. जो पर्यंत तक्रारींचे निराकरण होणार नाही तोपर्यंत ती समस्या संगणकामधून मिटविली जाणार नाही. असेही त्यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले.

शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण लक्षात घेऊन यंदाही कृषी पिक विमा योजना राबविण्यात आली. खरीप हंगाम २०१५ च्या साठी विमा कंपन्यांना शासनाच्या अनुदानातील हिश्याचे ७८ कोटी ११ लाख ८७ हजार ६७९ रुपये मंजुर केले. जिल्हयात असणाऱ्या १३०० पैकी ३६७ गावात पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले. अडचणीत असलेल्या या शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी जिल्हयाला १४ कोटी ३६ लाख रुपये शासनाने उपलब्ध करुन दिले आहेत अशी माहिती त्यांनी भाषणात पुढे दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून जलयुक्त शिवार अंतर्गत गडचिरेाली जिल्हयात विविध कामे घेण्यात आली. जलयुक्त शिवार अंतर्गत १५२ गावांमध्ये विविध प्रकारची २ हजार४४४ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. आतापर्यंत ३८ कोटी रुपये खर्चाने २१६० कामे विविध विभागांच्या माध्यमातून पूर्ण झाली आहेत असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, उर्वरीत काम मार्च अखेर पूर्ण करण्यात येणार आहे आणि या आर्थिक वर्षात १६९ गावांची नव्याने निवड करण्यात आलेली आहे. तसेच सौर उर्जेवर चालणारे दुर्गम आदिवासी भागातील शेतक-यांना ज्या ठिकाणी विद्युत पुरवठा नाही अशा दुर्गम भागात शेतक-यांना १२५ सौर उर्जेवर चालणारे मोटार पंप देण्यात येणार आहे. खासदार तसेच आमदार आणि इतर लोकप्रतिनिधींनी ४४ विविध कामांचे भूमीपूजन केले होते. पूर्ण झालेल्या सर्व कामांच्या माध्यमातून १५३१ हेक्टर अतिरिक्त क्षेत्र आता सिंचनाखाली येणार आहे. याबद्दल सर्व संबंधित यंत्रणांचे त्यांनी यावेळी अभिनंदन केले

आपला हा जिल्हा आदिवासी बहुल असला तरी बदललेला "डिजिटल इंडिया " ला साजेसे शैक्षणिक वातावरण आदिवासी आश्रम शाळेमध्ये राहील याची खबरदारी शाळा घेईल. हा दर्जा आणि दर्जेदार शिक्षणाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते शिक्षक आणि जबाबदार अधिकारी कायम राखतील अशी अपेक्षा राजे अंब्रीशराव यांनी यावेळी व्यक्त केली. यासाठी अधिकाऱ्यांनी वेळोवेळी भेटी व तपासणीच्या माध्यमातून आपले योगदान देणे आवश्यक आहे. नुकतेच शिक्षण विभागाचे आयुक्त यांनी प्रत्यक्ष भेट देवून जिल्हयातील दुर्गम भागात जाऊन शाळांची तपासणी करुन अधिकाऱ्यांना अडीअडचणी सोडविण्याच्या दृष्टीने आदेश दिले आहेत. राज्यात विद्यार्थ्यांच्या दप्तरांच्या ओझ्याचा भार हलका करण्याबाबत वारंवार तक्रारी होत्या त्या आता शासनानी सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या वजनाची तपासणी करुन वजन कमी करण्यात आले असल्याचेही ते म्हणाले.

अदिवासी बहूल क्षेत्रासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून यावर्षी प्रस्तावानुसार १५६ कोटी ५८ लक्ष रुपयांचा आराखडा मंजुर करण्यात आला आहे. या विभागाच्या आणि जिल्हयाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही याची दक्षता शासन घेत आहे. असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले की, आपला जिल्हा उत्तम पर्यटन संधीचा जिल्हा आहे. यात वन पर्यटनासोबत धार्मिक पर्यटन प्राधान्याने विचारात घेता येईल. येथे जिल्हयाची ओळख असणारे विदर्भ काशी अर्थात मार्कंडेश्वर मंदीर तसेच मोठया प्रमाणावर भारतभरातून पुष्कर यात्रेसाठी जिथे भाविक येतात असे सिरोंचा येथील गोदातटीचे श्री. कालेश्वर मंदिर आणि आरडा व सोमनूर या भागाच्या विकासासाठीही आगामी काळात नियोजन करण्यात आलेले आहे.

आदिवासी विभागाप्रमाणेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून देखील ग्रामीण भागात विकासकामे करण्यात येत आहेत. गेल्या तीन वर्षात ६ हजार ४९१ घरकुले बांधण्यात आली आणखी ७ हजार ७९४ घरकुले बांधण्यास शासनाने मंजूरी प्रदान केली आहे. याचा फायदा ग्रामीण भागातील भूमीहीन बांधवाना होणार आहे असेही राजे अंब्रीशराव यांनी यावेळी सांगितले.

नवनिर्मित अशा आपल्या या गडचिरेाली जिल्हयाचा झपाटयाने विकास होत आहे. त्यामुळे शहरी भागातही मूलभूत सुविधांचा विकास होणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने जिल्हयात 9 तालुक्यांच्या ठिकाणी ग्रामपंचायतींच्या जागी नगरपंचायती केल्या आहेत. यामुळे जिल्हयातील शहरी भागांचा चेहरा बदलेल याची खात्री असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

जिल्हयात विकासकामांची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर असते. १ ऑगस्टपासून महाराजस्व अभियान इथे सुरु झाले आहे. नागरिकांच्या विविध प्रकारच्या कामांना गतिमान पध्दतीने पूर्ण करण्याचे उद्दीष्ट यामध्ये ठेवण्यात आले आहे. विविध प्रकारचे दाखले देणे,चावडी वाचन, तसेच जमीन फेरफार , आदिवासी बांधवांच्या जमिनी परत देणे आदी कामांचा गतिमान निपटारा या माध्यमातून होत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाचे कौतुक त्यांनी याप्रसंगी केले.

आरोग्य सुविधांबाबत बोलताना ते म्हणाले की, पोहचविणे हे आव्हानात्मक काम आहे. या कामी उपलब्ध मनुष्यबळ कायम राखण्याच्या दृष्टिकोनातून आरोग्य खात्यातील डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ५८ वरुन ६० पर्यंत वाढविण्याचा क्रांतीकारी निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे थेट भरतीने करण्यात येत आहे. जिल्हयात आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून सेवा पुरविण्यात येतात जिल्हास्तरावर रुग्णालयाखेरीज ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ३७६ उपकेंद्र या सोबतच ३६ आरोग्य पथके सर्वांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. केंद्राच्या मिशन इंद्रधनुष अतंर्गत बालकांच्या लसीकरणाची विशेष मोहिम मध्यंतरीच्या काळात घेण्यात आली. माता-बाल संगोपन याकडे जिल्हयात विशेष लक्ष पुरविण्यात येत आहे.

देशपातळीवर नागरिकांना केवळ १ रुपया महिना इतका नाममात्र योगदानावर २ लक्ष रुपयांचे संरक्षण देणारी विमा योजना केंद्रातील सरकारने आणली यालाही जिल्हयात उत्तम प्रतिसाद लाभला आहे. याखेरीज अटल पेन्शन योजना तसेच पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि प्रत्येक नागरिकाला बँकेत खाते उघडून देणा-या जनधन विमा योजनेचे काम देखील जिल्हयात प्रगतीपथावर आहे. या सर्व योजनांचा लाभ अधिकआधिक जनतेला मिळावा यासाठी सर्वांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्हयातील वनधनाला व्यापक बाजारपेठ मिळण्यासाठी नुकतीच राज्याचे वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी पतंजली उद्योग समूहासोबत चर्चा केली आणि त्यांनी उद्योग सुरु करण्यास सहमती दर्शविली असून या वनधनाच्या विक्रीतून कमीतकमी २० कोटी रुपयाची मासीक उलाढाल होऊ शकेल यामुळे जिल्हयातील बेरोजगाराचा प्रश्न सोडविण्यास मदतच होईल.

जिल्ह्यात विकासरथ असणारी ही विकासाची रेल्वे आपण अधिक जोमाने एकत्रितरित्या प्रयत्न करुन अधिक गतिमान करू असे आवाहन राजे अंब्रीशराव यांनी आपल्या भाषणात यावेळी केले.

अतिशय उत्साही वातावरणात आजचा हा सोहळा पार पडला. येथील पोलिस कवायत मैदानावर चहुबांजूनी गडचिरोली वासीयांनी संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम बघण्यासाठी गर्दी केली होती. आजच्या संचलन पोलिस, महिला पोलिस पथक, गृहरक्षक दलाचे पथक, शिवाजी विद्यालयाचे एन.सी.सी. आणि स्काऊट पथक, पोलिस दलाचे श्वानपथक तसेच बॉम्बशोधक पथक आदी सहभागी झाले होते.

संचलनानंतर जिल्हा माहिती कार्यालय आणि पोलिस दलातर्फे लोकचेतना नाटय मंचचे पथनाटय तसेच चांदाळा येथील स्वा. सावरकर आश्रम शाळा, जिल्हा परिषद शाळा आणि गोंडवाना सैनिक विद्यालय यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तत्पूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विभागातील पुरस्कार विजेत्यांना गौरविण्यात आले.

जिवाची बाजी लावून नक्षलवाद्यांच्या विरोधात लढणा-या पाच पोलीसांना शौर्य पदक प्राप्त झालेल्या . सहाय्यक पोलीस निरिक्षक मनोहर कोरेटी, पोलीस हवालदार चंद्रय्या मदनय्या गोदारी, पोलीस नाईक गंगाराम मदनय्या सिडाम, नागेश्वर नारायन कुमराम ,बापु किष्टया सुरमवार तसेच बॉक्सिंग या खेळासाठी जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार आदित्य सुधाकर मने व मार्गदर्शक पुरस्कार यशवंत दिवाकर कुरुडकर तसेच स्वयंस्फुर्तीने ग्रामीण व शहरी भागात युवकांचे विकासांकरिता विविध शिबिराचे आयोजन केल्या बाबत जिल्हा युवा पुरस्कार युवक गटातून संतोष बोलुवार व युवती गटातून अर्चना लहूजी चुधरी यावेळी मंत्रीमहोदयाचे हस्ते गौरविण्यात आले. युवा गटात उत्कृष्ट स्वंयसेवी संस्था म्हणून वडसा येथील आरोग्य प्रबोधिनीला पुरस्कार मिळाला. जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित या संस्थेचे अध्यक्ष डॉ. सूर्यप्रकाश गभने हे आहेत.

कार्यक्रमाचे संचालन सहा. क्रीडा अधिकारी मदन टापरे, विनोद दशमुखे आणि पोलिसांच्या जनसंपर्क अधिकारी तेजस्वी पाटील यांनी केले.

कार्यक्रमाला परिसरातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकार, नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment